मुंबई: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा आठवड्याचा पहिलाच दिवस अत्यंत निराशेचा ठरला आहे. जागतिक स्तरावर, विशेषतः अमेरिका आणि इराणमधील वाढता संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे दलाल स्ट्रीटवर भीतीचे सावट पसरले आहे. सोमवारी (11 मे 2026) बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'सेन्सेक्स' 1.22 टक्क्यांनी म्हणजेच सुमारे 944 अंकांनी कोसळून 76,384 वर आला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 'निफ्टी' 1.15 टक्क्यांनी घसरून 23,897 या स्तरावर पोहोचला आहे.
कच्च्या तेलाचा भडका आणि ओएमसी कंपन्यांची पडझड
मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. 'ब्रेंट क्रूड'चे वायदे 3.16 टक्क्यांनी वाढून 104.49 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा थेट फटका भारतातील तेल विपणन कंपन्यांना (OMCs) बसला आहे. शेअर बाजारात सुरुवातीच्या सत्रात 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन' 2.1 टक्क्यांनी, 'हिंदुस्तान पेट्रोलियम' सुमारे 2 टक्क्यांनी, तर 'भारत पेट्रोलियम' 1.9 टक्क्यांनी घसरले आहेत. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे या कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे.
आशियाई बाजारात संमिश्र कल, पण भारत पिछाडीवर
एकीकडे भारतीय बाजार कोसळत असताना, आशियातील इतर काही बाजारांमध्ये मात्र विक्रमी तेजी पाहायला मिळाली. दक्षिण कोरियाचा 'कोस्पी' निर्देशांक 3.67 टक्क्यांनी वधारून ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला, तर जपानचा 'निक्केई' 0.81 टक्क्यांनी वधारला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत घसरण झाली. अमेरिका आणि इराणमधील तणाव जागतिक पुरवठा साखळीसाठी धोकादायक ठरू शकत असल्याने भारतीय गुंतवणूकदार अत्यंत सावध पवित्रा घेत आहेत.
हेही वाचा: National Technology Day 2026 : भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात उंच भरारी! पोखरण परमाणू परीक्षणामुळे मिळाली जागतिक पातळीवर नवी ओखळ; जाणून घ्या पोखरण 2 चा 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिना'शी थेट संबंध
बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव
निफ्टी बँक निर्देशांकातही आज मोठी पडझड पाहायला मिळाली. बँक निफ्टी 1.13 टक्क्यांनी घसरून 54,683 च्या स्तरावर व्यवहार करत आहे. निफ्टीमधील 50 पैकी केवळ तीन शेअर्स हिरव्या निशाणीत आहेत. यामध्ये टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, मॅक्स हेल्थकेअर आणि अपोलो हॉस्पिटल्स यांनी कशीबशी आपली पकड टिकवून ठेवली आहे. उर्वरित सर्व मोठे शेअर्स मंदीच्या गर्तेत असून बँकिंग क्षेत्रात मोठी विक्री दिसून येत आहे.
तिमाही निकालांकडे गुंतवणूकदारांचे लक्ष
आज अनेक दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. यामध्ये कॅनरा बँक, इंडियन हॉटेल्स, युपीएल, पिव्हीआर आयनॉक्स आणि ॲबॉट इंडिया यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. या निकालांचा परिणाम आगामी सत्रात संबंधित शेअर्सवर दिसून येईल. मात्र, सध्या जागतिक तणावाचा प्रभाव देशांतर्गत घडामोडींवर भारी पडताना दिसत आहे.
काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?
कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या पार गेल्याने महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत बाजार तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना घाईने गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक राजकीय स्थिती स्थिर होईपर्यंत बाजारात अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे आहेत. जोपर्यंत निफ्टी पुन्हा 24,000 च्या वर स्थिरावत नाही, तोपर्यंत सावध राहणेच हिताचे ठरेल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!)
हेही वाचा: Priyanka Chaturvedi: 'रुपया कोसळतोय अन् सरकार सल्ले देतंय'; प्रियांका चतुर्वेदी यांचा पंतप्रधान मोदींनी दिलेल्या सूचनेवर पलटवार