Indian Vehicles Dominate In Foreign Market: भारतीय वाहन उद्योगाने या आर्थिक वर्षात ऐतिहासिक झेप घेतली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतातून प्रवासी वाहनांच्या निर्यातीत तब्बल 18 टक्क्यांची वाढ झाली असून, भारतीय गाड्यांचे परदेशी बाजारपेठेत वर्चस्व ठळकपणे दिसून येत आहे. या वाढीमध्ये मारुती सुझुकी इंडियाचा वाटा सर्वाधिक आहे. कंपनीने केवळ या सहा महिन्यांतच 2 लाखांहून अधिक वाहने परदेशी बाजारात पाठवली, ज्यामुळे ही कंपनी देशातील अग्रगण्य निर्यातदार ठरली आहे.
निर्यातीचा विक्रमी आकडा
ऑटोमोबाईल उत्पादकांच्या संघटना सियाम (SIAM) च्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातून 4,45,884 प्रवासी वाहने निर्यात झाली आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 3,76,679 इतका होता. म्हणजेच अवघ्या एका वर्षात 18.4 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
हेही वाचा - Kamala Harris : डोनाल्ड ट्रम्पना धक्का बसणार ? कमला हॅरिस यांचे राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याचे संकेत
वाढीचा सर्वाधिक वेग कोणत्या श्रेणीत?
प्रवासी कारची निर्यात 12 टक्क्यांनी वाढून 2,29,281 युनिट्स झाली. त्याचवेळी, उपयुक्तता वाहनांची म्हणजे SUV प्रकारातील गाड्यांची निर्यात 26 टक्क्यांनी वाढून 2,11,373 युनिट्स वर पोहोचली. व्हॅन श्रेणीतही चांगली वाढ दिसून आली असून, ती 36.5 टक्क्यांनी वाढून 5,230 युनिट्स झाली आहे.
हेही वाचा - Donald Trump: ट्रम्प यांचा आक्रमक निर्णय! अमेरिकेची लाखो टन वजनाची युद्धनौका सागरात; नव्या युद्धाची चाहूल?
कंपनीनिहाय कामगिरी
या वाढीमध्ये सर्वाधिक आघाडी मारुती सुझुकीने घेतली आहे. कंपनीने एकूण 2,05,763 वाहने निर्यात केली, ज्यात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. ह्युंदाई इंडियाने या कालावधीत 99,540 वाहने निर्यात करून 17 टक्क्यांची वाढ नोंदवली. तथापी, निसान इंडियाने 37,605, फोक्सवॅगनने 28,011, टोयोटाने 18,880, किआ मोटर्सने 13,666 आणि होंडाने 13,243 वाहने परदेशी बाजारपेठेत पाठवली.
भारतीय गाड्यांची वाढती लोकप्रियता
भारतीय गाड्यांना विशेषतः पश्चिम आशिया आणि लॅटिन अमेरिका या बाजारपेठांमधून मोठी मागणी येत आहे. सियामच्या माहितीनुसार, या वर्षी भारताने 24 देशांमध्ये निर्यात वाढवली आहे. यामध्ये दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), जर्मनी, टोगो, इजिप्त, व्हिएतनाम, इराक, मेक्सिको, रशिया, केनिया, नायजेरिया, कॅनडा, पोलंड, श्रीलंका, ओमान, थायलंड, बांगलादेश, ब्राझील, बेल्जियम, इटली आणि टांझानिया यांसारख्या देशांचा समावेश आहे.