IND vs ZIM: T-20 विश्वचषक 2026 मध्ये आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात अत्यंत महत्त्वाचा 'सुपर 8' सामना खेळला जात आहे. चेन्नईच्या ऐतिहासिक एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) हा थरार रंगणार आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण करण्यात आले असून, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया बोर्डवर मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
भारतीय संघात दोन मोठे बदल; संजू आणि अक्षरचे पुनरागमन
आजच्या या निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मागील सामन्यात खेळलेले रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदरला आज विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
उपांत्य फेरीसाठी भारताला विजय आवश्यक
सुपर 8 फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघासाठी आता 'करा किंवा मरा' अशी स्थिती निर्माण झाली आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. दुसरीकडे, झिम्बाब्वेलाही त्यांच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विशेष म्हणजे, भारतीय भूमीवर भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला जाणारा हा पहिलाच T-20 आंतरराष्ट्रीय सामना आहे.
दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारी
आत्तापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात एकूण 13 T-20 सामने झाले आहेत. यामध्ये भारताचे पारडे जड राहिले असून भारताने 10 वेळा विजय मिळवला आहे, तर झिम्बाब्वेला केवळ 3 वेळा यश आले आहे. 2024 मध्ये घरच्या मैदानावर भारताला झिम्बाब्वेकडून पराभवाचा धक्का बसला होता, मात्र त्यानंतर भारतीय संघात अनेक बदल झाले असून सध्या टीम इंडिया मजबूत स्थितीत दिसत आहे.
हेही वाचा - DY Patil T20 Cup: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, अवघ्या 14 चेंडूत ठोकलं अर्धशतक; गोलंदाजांची उडवली दाणादाण
सामन्यासाठी दोन्ही संघ खालीलप्रमाणे:
भारतीय संघ (Playing XI): इशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
झिम्बाब्वे संघ (Playing XI): तादिवानाशे मारुमणी (यष्टीरक्षक), ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रझा (कर्णधार), टोनी मुन्योंगा, तशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, रिचर्ड नगारवा, ब्लेसिंग मुझाराबानी, वेलिंग्टन मसाकादझा.