नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुढील दशकात आपल्या इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी टप्प्यात प्रवेश करत आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’, नवी प्रक्षेपण स्थळे आणि भविष्यात दरवर्षी 50 प्रक्षेपण या सर्व गोष्टींसाठी इस्रो सज्ज आहे.
नारायणन म्हणाले, “पंतप्रधानांनी आधीच दरवर्षी 50 लॉन्च करण्याचं लक्ष्य ठरवलं आहे आणि आम्ही त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. सध्या श्रीहरिकोटामध्ये दोन लॉन्चपॅडमधून सर्व मोहिमा पूर्ण केल्या जातात, पण ती एक मर्यादा आहे. त्यामुळे तामिळनाडूमधील कुळसेकरपट्टणम येथे भारताचे दुसरे अंतराळ केंद्र आणि श्रीहरिकोटामधील तिसरे लॉन्चपॅड विकसित केले जात आहे.”
कुळसेकरपट्टणम प्रक्षेपण केंद्र 2027 च्या अखेरीस तयार होईल, तेव्हा भारत दरवर्षी 30 हून अधिक प्रक्षेपणं करू शकेल. तर 2029 पर्यंत तिसरे लॉन्चपॅड पूर्ण झाल्यावर ही संख्या 50 प्रक्षेपणांपर्यंत पोहोचेल. “लघु उपग्रह रॉकेट्ससाठी खासगी क्षेत्रालाही छोटे लॉन्चपॅड उभारण्याची परवानगी देण्यात येत आहे, ज्यामुळे देशाची एकूण प्रक्षेपण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल,” असं नारायणन यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
हेही वाचा: Masood Azhar : पंतप्रधान मोदींनी रडवलेल्या दहशतवादी मसूद अझहरची नवीन ऑडिओ क्लिप व्हायरल
इस्रोच्या Next Generation Launch Vehicle (NGLV) या नव्या रॉकेट प्रकल्पावरही काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प सुमारे 7 ते 8 वर्षांचा असून, त्याची रचना पूर्ण झाली आहे. “या रॉकेटसाठी नवा सेमी-क्रायोजेनिक इंजिन विकसित केला जात आहे आणि त्याच्या चाचण्या पुढील तीन वर्षांत सुरू होतील,” असं नारायणन यांनी स्पष्ट केलं.
तसेच पहिलं इंडस्ट्री-बिल्ट पसंलव हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो यांच्या संयुक्त सहकार्याने तयार आता प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. हे PSLV 34 प्रयोगांसह एक तांत्रिक प्रदर्शन उपग्रह (Technology Demonstration Satellite) घेऊन जाणार आहे.
गगनयान मोहिमेच्या प्रगतीबाबत बोलताना नारायणन म्हणाले, “आम्ही सध्या TV-D2 (दुसरी चाचणी मोहीम) साठी सिम्युलेशन टेस्ट करत आहोत. ही G1 (पहिली मानवरहित उड्डाण चाचणी) नंतर आणि G2 आधी होईल. या चाचणीमध्ये विविध ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत ‘अॅबॉर्ट सिस्टीम’ योग्यरीत्या कार्य करते का हे तपासले जाईल.”
त्यांनी सांगितले की, “आमचं प्राधान्य सध्या G1 आहे, जी आम्ही डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर TV-D2 आणि मग G2 होईल.”
नारायणन यांनी पुढे सांगितले की, “इस्रोचं उद्दिष्ट नियंत्रण ठेवणं नव्हे, तर भारतातील अंतराळ इकोसिस्टम वाढवणं आहे. खाजगी उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांना या प्रक्रियेत सामील करून भारताला ‘ग्लोबल स्पेस पॉवर’ बनवायचं आहे.”
हेही वाचा: Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यरची प्रकृती आता स्थिर; हॉस्पिटलमधून केली भावनिक पोस्ट, चाहत्यांना दिला दिलासा