Thursday, November 13, 2025 01:53:41 PM

ISRO LMV3 Launch: श्रीहरिकोटावरून इस्रोचं नवं मिशन; CMS-03 उपग्रह भारताच्या संचार क्षमतेला नवी दिशा

इस्रो रविवारी श्रीहरिकोटावरून LVM3-M5 रॉकेटद्वारे CMS-03 संचार उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. 24 तासांची उलटी गिनती सुरू असून सर्व प्रणाली सज्ज आहेत.

isro lmv3 launch श्रीहरिकोटावरून इस्रोचं नवं मिशन cms-03 उपग्रह भारताच्या संचार क्षमतेला नवी दिशा

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश): भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो रविवारी आपल्या नव्या आणि अत्याधुनिक LVM3-M5 रॉकेटच्या माध्यमातून CMS-03 संचार उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. या मिशनसाठी शनिवारी सकाळी 24 तासांची उलटी गिनती सुरू झाली असून सर्व प्रणाली तयार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. सुमारे 4,410 किलोग्राम वजनाचा CMS-03 हा आतापर्यंत भारतीय भूमीवरून भू-समकालिक स्थानांतरण कक्षेत (GTO) प्रक्षेपित होणारा सर्वात जड संचार उपग्रह ठरणार आहे. हा उपग्रह इस्रोच्या ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या LVM3-M5 रॉकेटद्वारे अवकाशात पाठवला जाणार आहे.

हे रॉकेट 43.5 मीटर उंच असून, प्रक्षेपणाची वेळ 2 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.26 वाजता निश्चित करण्यात आली आहे. इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉन्च व्हेइकल आणि स्पेसक्राफ्टचे एकत्रीकरण पूर्ण झाले असून, रॉकेटला श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातील दुसऱ्या लॉन्च पॅडवर हलवण्यात आले आहे. इस्रोने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “काउंटडाऊन कमेन्सेस!! सर्व तयारी पूर्ण झाली असून उलटी गिनती अधिकृतपणे सुरू झाली आहे. सर्व प्रणाली कार्यरत आहेत.” LVM3 रॉकेट हे तीन टप्प्यांमध्ये कार्यरत आहे. दोन S200 सॉलिड बूस्टर्स, एक L110 लिक्विड स्टेज, आणि अंतिम C25 क्रायोजेनिक स्टेज. हे रॉकेट 8,000 किलोग्राम वजनाचे पेलोड लो अर्थ ऑर्बिटमध्ये (LEO) आणि 4,000 किलोग्रामपर्यंत वजनाचे पेलोड GTO मध्ये प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे.

हेही वाचा:Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे समजणार उच्च रक्तदाबाची लक्षणे, आता एआय चालवणार तुमची हेल्थ अलर्ट सिस्टम

इस्रोच्या माहितीनुसार, LVM3-M5 हे पाचवे ऑपरेशनल फ्लाइट असून, या वाहनातील सर्व तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी विकसित केले गेले आहे, ज्यामध्ये C25 क्रायोजेनिक स्टेजचा समावेश आहे. 2014 मध्ये झालेल्या पहिल्या प्रयोगात्मक उड्डाणानंतर या रॉकेटने प्रत्येक मिशनमध्ये शंभर टक्के यश मिळवले आहे. CMS-03 हा मल्टी-बँड कम्युनिकेशन उपग्रह असून तो भारतीय भूभाग आणि भारतीय महासागर क्षेत्रावर संचार सेवा प्रदान करेल. या उपग्रहाद्वारे भारताच्या दूरसंचार क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. याच LVM3 रॉकेटचा मानव-सज्ज प्रकार भविष्यातील गगनयान मिशनसाठी वापरण्याची इस्रोची योजना आहे.

याआधी 2018 मध्ये इस्रोने फ्रेंच गयाना येथून 5,854 किलोग्राम वजनाचा GSAT-11 उपग्रह प्रक्षेपित केला होता, जो आतापर्यंत भारताने तयार केलेला सर्वात जड उपग्रह ठरला होता. LVM3 चे मागील यशस्वी मिशन म्हणजे चांद्रयान-3, ज्याद्वारे भारताने 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला. आता CMS-03 मिशनकडूनही इस्रोलाच नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा: PM Narendra Modi: बिहारमध्ये मोदींचा प्रचार दौरा; आरा, नवादा आणि पटना येथे भव्य सभा व रोड शो

        

सम्बन्धित सामग्री