नवी दिल्ली: कर्नाटक सरकारने सरकारी शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कारवाया रोखण्यासाठी नियम लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राज्यमंत्री प्रियांक खर्गे यांनी गुरुवारी सांगितले.
कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सुपुत्र प्रियांक खर्गे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना विनंती केली आहे. त्यांनी म्हटले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर अशा संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यास कडक बंदी घालावी. विनंती करताना त्यांनी कर्नाटक नागरी सेवा नियमांचा संदर्भ दिला आहे.
कर्नाटक नागरी सेवा नियमांचा संदर्भ दिला
प्रियांक खर्गे यांनी 13 ऑक्टोबर रोजी लिहिलेल्या पत्रात नियमांमधील काही ओळी सांगितल्या आहेत. ज्यात म्हटले आहे की, "कोणताही सरकारी कर्मचारी, कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा राजकारणात गुंतलेल्या कोणत्याही संघटनेचा सदस्य राहणार नाही किंवा त्याच्याशी संबंधित राहणार नाही किंवा कोणत्याही राजकीय चळवळीत किंवा उपक्रमात भाग घेऊ शकणार नाही किंवा योगदान देऊ शकणार नाही किंवा कोणत्याही प्रकारे मदत करू शकणार नाही."
हेही वाचा: RBI Repo Rate Cut Possibility: वैयक्तिक कर्जाचा EMI कमी होणार? RBI कडून डिसेंबरमध्ये रेपो दर कपातीची शक्यता
प्रियांक खर्गे म्हणाले की, या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्या तरी, अलिकडच्या काळात असे दिसून आले आहे की सरकारी अधिकारी आणि कर्मचारी आरएसएस आणि इतर अशा संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी आवाहन केले की, राज्यातील सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरएसएस आणि इतर अशा संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास सक्त मनाई करावी."
मंत्र्यांनी अलीकडेच सिद्धरामय्या यांना एक पत्र लिहून सरकारी, सरकारी अनुदानित शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आरएसएसच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची विनंती केली होती. मंगळवारी त्यांनी फोनवरून धमक्या मिळाल्याचा दावा केला. मात्र, त्यांनी अद्याप औपचारिक पोलीस तक्रार दाखल केलेली नाही.
प्रियांक खर्गे यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये एक अज्ञात फोनवर त्यांना शिवीगाळ करत होता आणि गंभीर परिणामांची धमकी देत होता. सिद्धरामय्या म्हणाले की, प्रियांक खर्गे यांची सुरक्षा वाढवली जाईल, तर राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले की, सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे. भारतीय जनता पक्षाने प्रियांक खर्गे यांच्या भूमिकेवर टीका केली आणि त्यांना राज्यात आरएसएसवर बंदी घालण्याचे आव्हान दिले.