Diwali Special Train: आगामी दिवाळी सणामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढणार असल्याचे लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुखद व्हावा, यासाठी दोन विशेष मेमू स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या आज म्हणजेच 5 ऑक्टोबरपासून धावायला सुरुवात करणार असून, मुंबई, कोकण आणि गोवा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पहिली विशेष गाडी – मडगाव ते लोकमान्य टिळक (01004 / 01003)
ही साप्ताहिक स्पेशल गाडी 5, 12 आणि 19 ऑक्टोबर 2025 रोजी धावेल. या ट्रेनला करमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे अशा महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे असतील. गाडी क्र. 01004 साठी तिकीट बुकिंग 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू झाले आहे.
कोच रचना (LHB Coaches):
एकूण 20 डबे
2 टायर एसी – 1
3 टायर एसी – 3
3 टायर एसी इकोनॉमी – 2
स्लीपर – 8
जनरल – 4
जनरेटर कार – 1
SLR – 1
हेही वाचा - हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली ! अनेक मुद्द्यांवर होणार चर्चा
दुसरी विशेष गाडी – चिपळूण ते पनवेल (01160 / 01159)
ही अनारक्षित मेमू स्पेशल गाडी 3 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान धावेल. ती प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी चालवली जाणार आहे. या गाडीला वरीलप्रमाणेच सर्व थांबे असतील. या निर्णयामुळे दिवाळी सुट्टीत मुंबई आणि कोकण दरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी कमी होईल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाचा लाभ घेता येईल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान, हंगामी गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी दादर–रत्नागिरी पॅसेंजर गाडी अद्याप बंदच आहे. कोरोना काळात थांबवलेली ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी कोकण विकास समिती आणि प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. दादर स्थानकावरून ही गाडी पुन्हा सुरू केल्यास प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Mumbai Smart Card: मुंबईत प्रवास होणार आता ‘मुंबई 1 कार्ड’ने; बेस्ट, मेट्रो, मोनो, एसटी आणि लोकलसाठी एकाच कार्डची सोय
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
तथापी, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रवासाचे आरक्षण वेळेवर करून घ्यावे. दिवाळीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावरील सुंदर निसर्ग आणि प्रवासाचा आनंद घेण्याची ही उत्तम संधी असल्याचेही रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.