Wednesday, December 11, 2024 11:41:50 AM

India Against Terrorism
रवांडातून भारतात आणला लष्कर - ए - तोयबाचा अतिरेकी

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना 'लष्कर - ए - तोयबा'चा एक अतिरेकी रवांडा सरकारने भारताकडे हस्तांतरित केला आहे. अतिरेक्याचे नाव सलमान खान असे आहे.

रवांडातून भारतात आणला लष्कर - ए - तोयबाचा अतिरेकी

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना 'लष्कर - ए - तोयबा'चा एक अतिरेकी रवांडा सरकारने भारताकडे हस्तांतरित केला आहे. सीबीआय आणि एनआयए यांनी इंटरपोलच्या मदतीने संयुक्त कारवाई करुन अतिरेक्याला कडेकोट बंदोबस्तात भारतात आणले आहे. बंगळुरूतील अतिरेकी कारवाया प्रकरणी अतिरेक्याला रवांडातून भारतात आणले आहे. या अतिरेक्याचे नाव सलमान खान असे आहे.

अतिरेकी सलमान खानचा बंगळुरूत 2023 मध्ये झालेल्या अतिरेकी कारवायांसाठी शस्त्र पुरवठा केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी सलमानची भारतात कसून चौकशी होणार आहे. बंगळुरूतील अतिरेकी कारवायांसाठी हेब्बल पोलीस ठाणे येथे एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याच प्रकरणात इंटरपोलच्या माध्यमातून दोन ऑगस्ट 2024 रोजी रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली होती. या नोटीस अंतर्गत कारवाई झाली आणि रवांडातून 'लष्कर - ए - तोयबा'च्या अतिरेक्याचे भारतात हस्तांतरण झाले आहे. 

याआधी सीबीआय आणि केरळ पोलीस यांनी इंटरपोलच्या मदतीने नोव्हेंबरच्या सुरुवातीला सौदी अरेबियातून दोन आरोपींना भारतात आणले होते. बरकत अली खान याच्यावर  2012 मधील दंगलीसाठी स्फोटके आणि शस्त्रास्त्र यांचा वापर केल्याचा आरोप आहे. तर रायहान अरबिक्कललारिक्कल याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

केंद्र सरकारने 2021 पासून आतापर्यंत इंटरपोलच्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त आरोपींना भारतात आणले आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत 26 आरोपींना परदेशातून भारतात आणण्यात आले आहे. 

सलमान खानला भारतात आणल्यामुळे अतिरेक्यांविरुद्धच्या भारत सरकारच्या मोहिमेला मोठे यश मिळाल्याची चर्चा आहे. सलमानच्या चौकशीतून अतिरेक्यांची भरती प्रक्रिया, अतिरेक्यांचे प्रशिक्षण, अतिरेक्यांच्या कारवाया याबाबत बरीच माहिती मिळण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo