Wednesday, April 22, 2026 11:04:13 PM

Ola Electric Scooter: ओला इलेक्ट्रिकला दणका! अवघ्या 2 दिवसांत स्कूटर बिघडली; ठाणे ग्राहक आयोगाने कंपनीला दिला 'हा' मोठा आदेश

नवी मुंबईतील एका ग्राहकाने कंपनीविरुद्ध पुकारलेला कायदेशीर लढा जिंकला असून, ठाण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने कंपनीला कठोर दणका दिला आहे.

ola electric scooter ओला इलेक्ट्रिकला दणका अवघ्या 2 दिवसांत स्कूटर बिघडली ठाणे ग्राहक आयोगाने कंपनीला दिला हा मोठा आदेश

Ola Electric Scooter: ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) स्कूटरच्या तांत्रिक बिघाडांमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निकाल समोर आला आहे. नवी मुंबईतील एका ग्राहकाने कंपनीविरुद्ध पुकारलेला कायदेशीर लढा जिंकला असून, ठाण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने कंपनीला कठोर दणका दिला आहे. ग्राहकाला दोषपूर्ण स्कूटर विकणे ही मोठी त्रुटी असल्याचे ताशेरे ओढत, आयोगाने कंपनीला संपूर्ण रक्कम व्याजासह परत करण्याचे किंवा नवीन स्कूटर देण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकी घटना आणि तक्रारदाराची व्यथा
हे प्रकरण नवी मुंबईतील एका वकीलाशी संबंधित आहे. त्यांनी जुलै 2024 मध्ये 96,997 खर्च करून ओला इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केली होती. मात्र, आनंदाचा हा क्षण फार काळ टिकला नाही. स्कूटरचा ताबा मिळाल्यानंतर अवघ्या 2 दिवसांतच प्रवेग (Acceleration) वाढवण्याबाबत गंभीर समस्या जाणवू लागल्या. एवढेच नव्हे, तर भर वाहतुकीत ही स्कूटर वारंवार बंद पडत असल्याने ग्राहकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

बॅटरीचा विचित्र बिघाड आणि 'सेवेतील त्रुटी'
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट 2024 रोजी स्कूटरच्या बॅटरीमध्ये अनाकलनीय बदल दिसून आले. अवघ्या 500 मीटरच्या प्रवासात बॅटरीची पातळी 21 टक्के वरून थेट 3 टक्के वर घसरली. वारंवार तक्रारी करूनही कंपनीकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. यावर आयोगाने स्पष्ट केले की, स्कूटरच्या वापराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच असे बिघाड होणे हे उत्पादन दोषपूर्ण असल्याचे लक्षण आहे. कंपनीने ग्राहकाला योग्य सेवा न देणे हे "अन्यायकारक व्यापार पद्धती" वापरण्यासारखे आहे, असेही आयोगाने नमूद केले.

आयोगाचा ऐतिहासिक निकाल
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, ग्राहक आयोगाने ओला इलेक्ट्रिकला स्पष्ट निर्देश दिले आहेत. कंपनीला ग्राहकाला तंतोतंत त्याच वैशिष्ट्यांची नवीन आणि बिनदोष स्कूटर द्यावी लागेल. जर कंपनी नवीन स्कूटर देऊ शकली नाही, तर ग्राहकाला खरेदीची संपूर्ण रक्कम म्हणजेच 96,997 परत करावी लागेल. विशेष म्हणजे, ही रक्कम 6 टक्के वार्षिक व्याजासह परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जो ग्राहकांसाठी मोठा विजय मानला जात आहे.

हेही वाचा - OnePlus Nord 6 मध्ये मिळणार 9000mAh ची अवाढव्य बॅटरी; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

ग्राहकांसाठी मोठा धडा
ओला इलेक्ट्रिक स्कूटरबाबत देशभरातून तक्रारींचे सत्र सुरू असतानाच ठाणे आयोगाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे. यामुळे कंपन्यांना त्यांच्या 'आफ्टर सेल्स सर्व्हिस' आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत अधिक गंभीर राहावे लागणार आहे. जर तुम्हीही अशाच प्रकारच्या तांत्रिक समस्यांनी त्रस्त असाल, तर ग्राहक न्यायालयात दाद मागून न्याय मिळवता येतो, हे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री