Passport Rule Changes: पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी 15 फेब्रुवारी 2026 ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पासपोर्ट सेवा अधिक वेगवान, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी नियमावलीत क्रांतिकारी बदल केले आहेत. या नवीन बदलांमुळे पासपोर्ट मिळवण्यासाठी लागणारा वेळ आता निम्म्याने कमी होणार आहे.
डिजिटल पोलीस पडताळणी: 10-15 दिवसांची प्रतीक्षा संपली
नव्या नियमांनुसार, सर्वात मोठा दिलासा पोलीस पडताळणीच्या प्रक्रियेत देण्यात आला आहे. आता पोलिसांना कागदपत्रांच्या फाईलची प्रतीक्षा करावी लागणार नाही. 'mPassport' पोलीस ॲपच्या माध्यमातून रिअल-टाइम डेटा जुळवला जाईल. यामुळे पूर्वी पडताळणीसाठी लागणारे 10 ते 15 दिवस आता केवळ 5 ते 7 दिवसांवर येतील.
कागदपत्रांशिवाय अर्ज आणि डिजीलॉकरचा वापर
आता अर्जदारांना कागदपत्रांच्या मोठ्या फाईल्स सोबत बाळगण्याची गरज उरणार नाही. आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे थेट 'डिजीलॉकर'द्वारे ऑनलाइन पडताळली जातील. ज्यांच्याकडे आधार आणि पॅन आहे, त्यांचा अर्ज अत्यंत सुलभतेने मंजूर केला जाईल. मात्र, अर्ज करताना सर्व कागदपत्रांवरील नाव आणि जन्मतारीख सारखीच असणे अनिवार्य आहे.
हेही वाचा - Chandrashekhar Bawankule : राज्य सरकारचा मोठा निर्णय! आता NA परवानगीशिवायही मिळणार कामांना गती
नूतनीकरण प्रक्रिया झाली अधिक सोपी
ज्यांना आपला पासपोर्ट नूतनीकरण (Renew) करायचा आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जर जुन्या पासपोर्टमधील माहिती आणि सध्याच्या माहितीत कोणताही मोठा बदल नसेल, तर आता पुन्हा पोलीस पडताळणी करण्याची गरज भासणार नाही. यामुळे नूतनीकरणाची प्रक्रिया अधिक वेगवान होईल.
एकल पालकांना मोठा दिलासा आणि 'POPSK' चा विस्तार
मुलांच्या पासपोर्टसाठी आता दोन्ही पालकांची उपस्थिती किंवा दोन्ही पालकांचे नाव अनिवार्य असण्याचे बंधन शिथिल करण्यात आले आहे. एकल पालकांना (Single Parents) आता केवळ स्वतःच्या नावाने मुलांचा पासपोर्ट मिळवता येईल. याशिवाय, ग्रामीण भागातील नागरिकांची सोय लक्षात घेऊन नवीन 'पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे' (POPSKs) सुरू करण्यात येणार आहेत.
स्मार्ट 'ई-पासपोर्ट' आणि बायोमेट्रिक अचूकता
15 फेब्रुवारीपासून अर्ज करणाऱ्यांना आता चिप-आधारित 'ई-पासपोर्ट' मिळतील. यामध्ये क्यूआर कोड (QR Code) आणि प्रगत बायोमेट्रिक चिप असेल, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इमिग्रेशन प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल. पासपोर्ट केंद्रांवरील फोटो आणि बायोमेट्रिक घेण्याची यंत्रणाही अधिक अचूक करण्यात आली आहे.