Thursday, June 11, 2026 10:28:59 PM

MK Stalin Defeat: तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर; मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि 'डीएमके' (DMK) पक्षाचे सर्वेसर्वा एम.के. स्टॅलिन यांचा त्यांच्या हक्काच्या कोलाथूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे.

mk stalin defeat तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव

MK Stalin Defeat: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये आजवरचा सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आणि 'डीएमके' (DMK) पक्षाचे सर्वेसर्वा एम.के. स्टॅलिन यांचा त्यांच्या हक्काच्या कोलाथूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. सुपरस्टार विजय 'थलपती' यांच्या 'तामिझगा वेट्री कझगम' (TVK) या पक्षाने या ऐतिहासिक विजयाची नोंद केली असून, संपूर्ण राज्यात या निकालाची चर्चा रंगली आहे.

जुन्या सहकाऱ्यानेच 'कोलाथूर'चा गड राखला
मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पराभवाची धूळ चारणारे दुसरे तिसरे कोणी नसून त्यांचेच माजी सहकारी व्ही.एस. बाबू हे आहेत. बाबू यांनी 'TVK' पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून स्टॅलिन यांचा सलग विजयाचा वारसा रोखला. विशेष म्हणजे, व्ही.एस. बाबू हे यापूर्वी स्वतः 'डीएमके'मध्येच होते आणि त्यांनी 2011 च्या निवडणुकीत याच मतदारसंघात स्टॅलिन यांचे निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहिले होते. मात्र, कालांतराने त्यांनी पक्ष बदलला आणि 7 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांनी अभिनेता विजय यांच्या पक्षात प्रवेश केला होता.

स्टॅलिन यांचा अभेद्य गड अखेर कोसळला
कोलाथूर विधानसभा मतदारसंघ हा एम.के. स्टॅलिन यांचा 'अभेद्य गड' मानला जात असे. 2011 मध्ये या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून सलग तीन वेळा (2011, 2016 आणि 2021) स्टॅलिन यांनी येथून दणदणीत विजय मिळवला होता. 2021 च्या निवडणुकीत त्यांनी 'एआयएडीएमके'च्या उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, या निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या पक्षाच्या लाटेत त्यांना आपली जागा वाचवता आली नाही.

करुणानिधींच्या वारशाला धक्का
तामिळनाडूच्या राजकारणातील दिग्गज नेते आणि पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांचे सुपुत्र म्हणून स्टॅलिन यांनी 2018 मध्ये पक्षाची धुरा सांभाळली होती. विल्लीवाक्कम आणि पुरासवाक्कम भागांचे एकत्रीकरण करून तयार झालेल्या कोलाथूर मतदारसंघात पहिल्यांदाच स्टॅलिन यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मतदारसंघात झालेला हा पराभव डीएमके पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हेही वाचा - R. Sabarinathan Leads In Virugambakkam : उमेदवारी मिळाल्यानंतरचे आनंदाश्रू ते विजयाच्या दिशेने वाटचाल; ड्रायव्हरच्या मुलावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला

विजयाचा 'थलपती' पॅटर्न
अभिनेता विजय यांच्या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत थेट मुख्यमंत्र्यांच्या जागेवर विजय मिळवून तामिळनाडूच्या राजकारणाची समीकरणे बदलून टाकली आहेत. कोलाथूरमधील हा निकाल तामिळनाडूत सत्तापरिवर्तनाचे सर्वात मोठे संकेत मानला जात असून, राज्याच्या राजकारणात 'TVK' एका बलाढ्य शक्तीच्या रूपात समोर आली आहे.


सम्बन्धित सामग्री