Kedarnath Temple Mobile Ban: हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र स्थळ मानल्या जाणाऱ्या केदारनाथ मंदिराच्या परिसरात आता मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांच्या वापरावर प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. मंदिर परिसरातील पावित्र्य राखण्यासाठी आणि भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात फोटो काढता येणार नाहीत किंवा 'रील्स' बनवता येणार नाहीत.
रील्सच्या वाढत्या ट्रेंडमुळे प्रशासनाचे पाऊल
गेल्या काही काळापासून केदारनाथमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक भक्तीपेक्षा मोबाईलवर रील्स आणि फोटो काढण्यात जास्त मग्न असल्याचे दिसून आले आहे. यामुळे मंदिराच्या परंपरा आणि प्रतिष्ठेला बाधा येत असून, इतर भाविकांना दर्शनासाठी अडथळा निर्माण होत आहे. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर समितीने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा - Nirmala Sitharaman Budget Saree: बजेटसोबत साडीचीही चर्चा! निर्मला सीतारामन यांच्या साडीचा पद्मश्री कलाकाराशी खास संबंध
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई
रुद्रप्रयागचे जिल्हा दंडाधिकारी प्रतीक जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'मंदिर परिसरात मोबाईलचा वापर इतर भाविकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे मंदिर समितीच्या सहकार्याने मोबाईल बंदीची ठोस योजना राबवण्यात येत आहे. यावेळेस नियमांची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे केली जाईल आणि जे भाविक या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.'
मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी 'लॉकर' सुविधा
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन आणि मंदिर समिती विशेष उपाययोजना करत आहे. मोबाईल बंदीचा अर्थ प्रवासात फोन वापरता येणार नाही असा नसून, केवळ मंदिर परिसरात तो प्रतिबंधित असेल. भाविकांना त्यांचे फोन सुरक्षितपणे ठेवता यावेत, यासाठी प्रवेशद्वाराजवळ 'लॉकर' किंवा सुरक्षित संकलन केंद्र उभारण्याबाबत प्रशासन विचार करत आहे. यामुळे भाविकांना कोणत्याही चिंतेशिवाय दर्शन घेता येईल.