Thursday, March 12, 2026 10:30:43 PM

Aramco Refinery Attack: सौदी अरेबियाच्या अरामको रिफायनरीवर भीषण ड्रोन हल्ला; कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ

अरामकोच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला असला, तरी सुरक्षेच्या कारणास्तव तेल शुद्धीकरण प्रक्रिया थांबवावी लागली आहे.

aramco refinery attack सौदी अरेबियाच्या अरामको रिफायनरीवर भीषण ड्रोन हल्ला कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ

Aramco Refinery Attack: मध्य पूर्वेतील युद्धाच्या ज्वाळा आता जागतिक अर्थव्यवस्थेला पोळू लागल्या आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी 'अरामको'च्या रास तनुरा या सर्वात मोठ्या रिफायनरीवर मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही रिफायनरी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अरामकोच्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला असला, तरी सुरक्षेच्या कारणास्तव तेल शुद्धीकरण प्रक्रिया थांबवावी लागली आहे. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 9.32 टक्के ची प्रचंड वाढ झाली आहे. दुबई आणि सौदीतील तेल क्षेत्रांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे जगभरात इंधन पुरवठ्याचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प; इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडणार
इराणसोबतच्या वाढत्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारपेठेसाठी हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक काळ ठरत आहे. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या पुरवठ्यापैकी पाचवा हिस्सा ज्या होर्मुझची सामुद्रधुनी मधून जातो, तो व्यापार आता जवळपास ठप्प झाला आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग बंद केला नसला, तरी युद्धाच्या धास्तीने जहाज मालकांनी स्वतःहून व्यवहार थांबवले आहेत. गेल्या 4 वर्षांतील कच्च्या तेलाच्या किमतीतील ही सर्वात मोठी वाढ असून, हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे.

खामेनींचा मृत्यू आणि अमेरिकेचा हस्तक्षेप; युद्धाचा भडका उडाला
या संपूर्ण वादाची ठिणगी शनिवारी पडली, जेव्हा अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विविध तळांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी मारले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या तेहरानने संपूर्ण आखाती प्रदेशात प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने इराणी जनतेला राजवट उलथवून टाकण्याचे आवाहन केले असले, तरी इराणने इस्रायलसह सौदी अरेबिया, कतार, युएई, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. अरामकोवरील हल्ला हा अमेरिका आणि मित्र राष्ट्रांवर आर्थिक दबाव आणण्याच्या सूडाचाच एक भाग मानला जात आहे.

हेही वाचा - Eknath Shinde Call : ठाण्यातील नागरिकही दुबईत अडकले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी फोनवरून साधला सवांद

जागतिक मंदीचा धोका; स्वयंपाकघराच्या बजेटवर थेट परिणाम
तज्ज्ञांच्या मते, इराणमधील हे युद्ध आता अशा टप्प्यावर पोहोचले आहे जिथे जागतिक मंदीची गडद सावली निर्माण झाली आहे. ट्रम्प प्रशासनाने आपल्या मोहिमेत यश मिळाल्याचा दावा केला असला, तरी तेलाच्या वाढत्या किमती आणि बंद पडणाऱ्या रिफायनरीज अमेरिकेसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. सौदी अरेबिया आणि युएई आता आपल्या सुरक्षेसाठी इराणला चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर मध्य पूर्वेतील हे युद्ध केवळ सीमांपुरते मर्यादित न राहता जगातील प्रत्येक घराच्या बजेटवर थेट परिणाम करेल.
 


सम्बन्धित सामग्री