एका लग्नसमारंभानंतर जे घडलं, त्याने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. टिफिनमध्ये सुरक्षित ठेवलेले लाखोंचे दागिने क्षणात गायब झाले. घरात कोणावर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही, बाहेरून कोणी शिरल्याचा पुरावा नाही. आणि त्याच वेळी घरातील एक सदस्यही अचानक बेपत्ता! सुरुवातीला सगळ्यांना हा बाहेरच्या चोरट्यांचा प्रकार वाटत होता, पण तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी एक अशी सत्यकथा उघड झाली, ज्याने पोलिसांनाही थक्क करून सोडलं.
या घटनेमागे झालं असं की, मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरहटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाने गेम खेळण्यासाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या आईचे सुमारे 15 लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांसह पोलिसही काही काळ संभ्रमात पडले होते.
सीधी जिल्ह्यातील बघेड़ी गावातील एक महिला तिच्या मुलासह रीवा येथे विवाह सोहळ्यासाठी आली होती. कार्यक्रमाहून परतल्यानंतर तिने आपले दागिने टिफिनमध्ये ठेवले. काही वेळानंतर टिफिनसह सर्व दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तात्काळ चोरहटा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवण्यात आली.
हेही वाचा: Matheran e-Rikshwa News : मोठी बातमी! माथेरानमध्ये उद्यापासून इ-रिक्षा चालकांचा संप, स्थानिकांसह पर्यटकांची होणार कोंडी
चौकशीदरम्यान महिलेचा अल्पवयीन मुलगाही अचानक बेपत्ता असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा मोबाईल क्रमांक ट्रेस केला असता त्याचे लोकेशन सीधी जिल्ह्यातील चोरहट आणि नंतर जमोडी परिसरात मिळाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुलाला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने चोरी नाकारली आणि पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत गोंधळ घातला.
सखोल चौकशीनंतर मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दागिने त्याच्या एका अल्पवयीन मित्राच्या घरी लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी उशिरा रात्री धाड टाकून संपूर्ण 15 लाख रुपयांचे दागिने जप्त केले. चोरहटा पोलीस ठाण्याचे प्रभारी आशीष मिश्रा यांनी सांगितले की, मुलगा ऑनलाइन गेमिंगचा आहारी गेला होता. गेममधील पैशांच्या व्यवहारांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्याने हे कृत्य केले असावे.
दरम्यान, पीडित महिलेने पोलिसांचे आभार मानत सांगितले की दागिने सुरक्षित परत मिळाले असून मुलाने त्याची चूक मान्य केली आहे. ही घटना पालकांसाठी गंभीर इशारा आहे. मुलांच्या ऑनलाइन अॅक्टिव्हिटीवर (Online Activity) लक्ष ठेवणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक झाले आहे. ऑनलाइन गेमिंगचे व्यसन कधी गुन्ह्यात परिवर्तित होईल, याचा अंदाज या घटनेतून स्पष्ट होतो.
हेही वाचा: India Vs Pakistan Match: काय घडलं लाहोरच्या 'त्या' गुप्त बैठकीत? भारत-पाकिस्तान मॅचबद्दल मोठी अपडेट समोर