नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमधील 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ला मिळालेल्या निर्णायक विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हा विजय बांगलादेशातील जनतेचा रहमान यांच्या नेतृत्वावर असलेला ठाम विश्वास दर्शवतो, असे म्हटले आहे.
संदेशामध्ये मोदी यांनी भारत नेहमीच “लोकशाहीवादी, प्रगत आणि सर्वसमावेशक” बांगलादेशाच्या पाठीशी उभा राहील, असे स्पष्ट केले. “बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी श्री. तारिक रहमान यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो,” असे त्यांनी नमूद केले. तसेच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि सामायिक विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अधिकृत निकाल अद्याप जाहीर व्हायचे असले तरी 300 सदस्यीय संसदेत बीएनपीला दोन-तृतीयांश बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार बीएनपीने आतापर्यंत 212 जागांवर विजय मिळवला आहे. दुसरीकडे जमात-ए-इस्लामी यांच्या नेतृत्वाखालील 11 पक्षीय आघाडीला अपेक्षित यश मिळाले नसून सुमारे 70 जागांवरच त्यांना विजय मिळवता आला आहे.
हेही वाचा: Lok Sabha Adjourned: लोकसभेचे कामकाज 9 मार्चपर्यंत तहकूब; 'या' नेत्याच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा जोरदार गदारोळ
बीएनपीचा मोठा विजय निश्चित मानला जात असल्याने तारिक रहमान बांगलादेशचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 17 वर्षांच्या स्वयंनिर्वासित जीवनानंतर ते बांगलादेशात परतले होते. मागील 36 वर्षांहून अधिक कालावधीनंतर देशाला पुरुष पंतप्रधान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, बांगलादेश निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मतदानाची टक्केवारी 47.91 टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. अंतिम आकडेवारीत काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नासिर उद्दीन यांनी मतदानाच्या टक्केवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करत, “मागील निवडणुकांमध्येही टक्केवारीवर वाद झाले होते, त्यामुळे यावेळी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये,” असे सांगितले.
जुलै 2024 मधील आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या सत्ताच्युततेनंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक ठरली. या निवडणुकीत 2,000 हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे चार या वेळेत मतदान पार पडले असून, सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे 10 लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
हेही वाचा: Sanjay Shirsat: मराठी माणसासाठी लढतो म्हणणारे हे आता गेले कुठं? शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना सवाल