नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सुरुवातीलाच आपल्या अर्थसंकल्पाची दिशा स्पष्ट केली. हा अर्थसंकल्प ग्यान (GYAN) अर्थसंकल्प असल्याचे त्या म्हणाल्या. या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच, या अर्थसंकल्पात महिलांना खास गिफ्ट देण्यात आलं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकार महिलांना 2 कोटी रूपयांपर्यंत कर्ज देणार आहे. हे कर्ज नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहे? या कर्जासोबत महिलांसाठी बजेटमध्ये आणखीण काय तरतूद करण्यात आली आहे, हे जाणून घेऊ.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
उद्योजक महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने 2 कोटी रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद केली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना हे कर्ज देणार आहे. सुरुवातीला देशातील 5 लाख महिलांनाच हे कर्ज दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज फक्त अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजक महिलांना दिले जाणार आहे. यासोबत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे या महिलांना रोजगार निर्माणही करता येणार आहे.
हेही वाचा : Union Budget 2025: अर्थसंकल्पातून पगारदारांना दिलासा
अर्थसंकल्पात ‘GYAN’वर भर…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, सरकारने ‘ग्यान’वर लक्ष केंद्रित केले आहे. GYAN म्हणजे G - गरीब, Y- तरुण, A- अन्नदाता आणि N - नारी शक्ती. या चार घटकांच्या अवतीभोवती फिरणारे आणि त्यांना दिलासा देणारे हे बजेट आहे, असे सीतारामन म्हणाल्या. आम्ही गेल्या 10 वर्षात बहुआयामी विकास केला आहे, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा : Union Budget 2025: अर्थसंकल्पातून काय स्वस्त, काय महाग?
विरोधकांकडून गदारोळ….
लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी बाकांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली. त्याच दरम्यान विरोधी बाकांवरून महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या मुद्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहता लोकसभा अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलण्यास वेळ दिला जाईल, असे सांगितले. त्यानंतरही सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू होती. केंद्र सरकार हिंदूविरोधी असल्याची घोषणाबाजी विरोधकांच्या बाकांवरून सुरू झाली. विरोधकांच्या गदारोळातच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले. काही वेळेनंतर विरोधकांनी घोषणाबाजी थांबवली.