नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्याच्या निमित्ताने जगातील सर्वात श्रीमंत राजाला भेटणार आहेत. हसनल बोल्किया हे ब्रुनेईचे २९ वे सुलतान आहेत. ते देशाचे सुलतान आणि पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. हसनल बोल्किया १९६७ पासून सुलतान म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१७ मध्ये सुलतान पदावर ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते.
हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत राजे म्हणून ओळखले जातात. त्यांची एकूण संपत्ती २८ अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. या राजाकडे सात हजार खासगी वाहनांचा ताफा आहे. या ताफ्यातील वाहनांची एकूण किंमत पाच अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. सुलतान हसनल बोल्किया यांच्याकडे अनेक महागड्या वाहनांचा ताफा आहे. यात ६०० रोल्सरॉइस आहेत. या रोल्सरॉइसपैकी एका रोल्सरॉइसला सोन्याचा मुलामा दिला आहे. सुलतानाच्या ताफ्यात ४५० फेरारी, ३८० बेंटली, पोर्शे, लॅम्बोर्गिनी, मेबॅच, जग्वार, बीएमडब्ल्यू आणि मॅकलॅरेन्स आहेत. सुलतानाचा राजवाडा हा सर्वात मोठा निवासी राजवाडा आहे. हा सोन्याचा मुलामा दिलेला वीस लाख चौरस फुटांचा राजवाडा आहे. राजवाड्यात १७०० शयनकक्ष, २५७ स्नानगृहं, पाच जलतरण तलाव, ११० गॅरेज आहेत. सुलतानाच्या मालकीच्या प्राणीसंग्रहालयात ३० बंगाली वाघ, विविध विदेशी पक्षी आहेत. सुलतान हसनल बोल्किया यांच्या मालकीचे बोईंग ७४७ विमान आहे.
भारत-ब्रुनेई राजकीय संबंधांना ४० वर्ष
भारत-ब्रुनेई राजकीय संबंधांना ४० वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने मोदी ब्रुनेईच्या दौऱ्यावर आहेत. ब्रुनेईला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. मोदी ब्रुनेईत पोहोचले असून या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत - ब्रुनेई संबंध
ब्रुनेईला भेट देणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान
भारत-ब्रुनेई दरम्यान १० मे १९८४ पासून राजकीय संबंध
ब्रुनेई सरकारकडून भारताच्या धोरणाचं समर्थन
भारत-ब्रुनेईत संरक्षण व्यापार दृढ करण्याचे प्रयत्न
ब्रुनेईकडून भारताला अंतराळ संशोधनात सहकार्य अपेक्षित