Mamata Banerjee Mimicry Video: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसताना दिसत असतानाच, रस्त्यावर एका आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हुबेहूब नक्कल करत तृणमूलच्या पराभवावर खोचकपणे नक्कल केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
पांढरी साडी आणि 'तीच' वेशभूषा
या भाजप कार्यकर्त्यांनी चक्क ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे पांढरी साडी नेसून आणि त्यांच्याच शैलीत वेशभूषा करून रस्त्यावर 'परफॉर्मन्स' सादर केला. ममता दीदींच्या चालण्या-बोलण्याच्या ढंगाची नक्कल करत या कार्यकर्त्याने तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला बसलेल्या सुरुंगावर मिश्किल भाष्य केले. ही नक्कल पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती.
"मोदींनी माझी खुर्ची चोरली!"
नकलेदरम्यान कार्यकर्त्याने ममता बॅनर्जी यांच्या शैलीत ओरडून आपली प्रतिक्रिया दिली. "अमित शाह आणि मोदींनी माझी खुर्ची चोरली, माझं सरकार चोरलं! आता मी इथून हलणार नाही, मी इथून उठणार नाही," असा संवाद त्याने साधला. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता जात असताना कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे आपला विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - West Bengal Election 2026: भाजप कार्यकर्त्यांचा ममतादीदींच्या घराबाहेर 'जय श्री राम'चा जयघोष; 185 जागांवर आघाडी घेत भाजपचे 'बहुमत' पार
सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ
बंगालमधील राजकीय वातावरणात सध्या तणाव आणि उत्साह दोन्ही पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भाजप 160 हून अधिक जागांवर आघाडीवर असताना, कार्यकर्त्यांच्या या अशा वागण्यामुळे तृणमूलच्या गोटात संतापाचे वातावरण आहे. मात्र, "माझी खुर्ची चोरली" हा डायलॉग सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चेत असून, निवडणुकीच्या निकालानंतरचे हे 'शक्तिप्रदर्शन' वेगळ्याच स्तरावर पोहोचले आहे.