देशभरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलवर अचानक NDMA कडून आलेल्या अलर्ट मेसेजमुळे काही ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. मोबाईल स्क्रीनवर 'Emergency Alert' किंवा 'Extremely Severe Alert' असा संदेश दिसल्याने अनेकांनी ही खरी आपत्तीची सूचना असल्याचा समज करून घेतला. मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हा संदेश केवळ चाचणीसाठी पाठवण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA देशभरात नव्या आपत्कालीन सूचना प्रणालीची चाचणी करत आहे. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, पूर, चक्रीवादळ, त्सुनामी किंवा इतर गंभीर परिस्थितीत नागरिकांपर्यंत तातडीने माहिती पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.
काय आहे Cell Broadcast Alert प्रणाली?
ही एक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एकाच वेळी सूचना पाठवता येतात. यासाठी इंटरनेटची आवश्यकता नसते. त्यामुळे नेटवर्क उपलब्ध असेल तर थेट मोबाईलवर संदेश पोहोचतो. सरकारकडून तयार करण्यात आलेली ही स्वदेशी प्रणाली भविष्यात आपत्तीच्या काळात जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
मेसेजमध्ये नेमकं काय लिहिलं होतं?
अनेकांना आलेल्या संदेशात 'NDMA will test Cell Broadcast Alerts on 2 May 2026 in your area. On receiving the message on your mobile phone, no action is required. Please do not panic.' असा मजकूर होता. याचा अर्थ तुमच्या परिसरात या प्रणालीची चाचणी सुरू असून कोणतीही कृती करण्याची गरज नाही.
'Extremely Severe Alert' का दिसते?
मोबाईल फोनमध्ये अशा प्रकारचे अलर्ट डिफॉल्ट पद्धतीने अधिक लक्ष वेधून घेण्यासाठी गंभीर श्रेणीत दाखवले जातात. त्यामुळे तो फक्त टेस्ट मेसेज असला तरी 'Extremely Severe' असा इशारा दिसू शकतो.
नागरिकांनी काय करावे?
या संदेशानंतर घाबरण्याची आवश्यकता नाही. हा फक्त चाचणी संदेश आहे. मोबाईलवर OK दाबून संदेश बंद करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
भविष्यात कसा होईल फायदा?
देशात पूर, भूकंप, वादळ यांसारख्या आपत्तींच्या वेळी सेकंदात लाखो लोकांना सतर्क करणे शक्य होणार आहे. त्यामुळे स्थलांतर, सुरक्षितता आणि बचावकार्य अधिक जलद होईल.