सिलीगुडी (पश्चिम बंगाल): केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांच्या विमानाची गुरुवारी भूतानला जाताना इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. दुपारी भूतानकडे रवाना झाल्यानंतर तीव्र पावसामुळे आणि वातावरणातील कमी दाबामुळे त्यांचे विमान सुरक्षिततेच्या कारणास्तव बागडोगरा विमानतळावर उतरवावे लागले.
वित्त मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, सीतारामन यांना आजच भूतानमध्ये पोहोचायचे होते, मात्र प्रतिकूल हवामानामुळे त्यांचा प्रवास स्थगित करण्यात आला आहे. त्या सध्या सिलीगुडी येथेच मुक्कामी आहेत आणि शुक्रवार सकाळी हवामान अनुकूल असल्यास पुन्हा भूतानसाठी रवाना होतील.
सीतारामन भूतानमध्ये भारत सरकारच्या सहाय्याने सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्प स्थळांना भेट देणार होत्या. तसेच त्या कुटीर आणि लघुउद्योग बाजाराचा (CSI Market) दौरा करून UPI व्यवहार प्रणालीच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेणार होत्या.
हेही वाचा: Buldhana Train Accident: सोशल मीडियाच्या मोहात जीव गमावला; धावत्या रेल्वेची धडक बसून तरुण ठार
प्रशासनिक सूत्रांच्या माहितीनुसार, हवामान स्थिर झाल्यास सीतारामन 31 ऑक्टोबरच्या सकाळी भूतानकडे रवाना होतील. त्या 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अधिकृत भूतान दौऱ्यावर असून भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात 1765 साली स्थापन झालेल्या सांगचेन चोखोर मठाच्या भेटीने व्हायची होती. हा मठ आधुनिक बौद्ध शिक्षणासाठी प्रसिद्ध असून 100 हून अधिक भिक्षू येथे वास्तव्यास आहेत.
निर्मला सीतारामन यांचा भूतानचे राजा महामहिम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे यांच्यासोबत अधिकृत भेटीचा कार्यक्रम ठरलेला होता. त्याचप्रमाणे त्या भूतानचे वित्त मंत्री लेके दोरजी यांच्यासोबत भारत-भूतान आर्थिक आणि वित्तीय सहकार्य मजबूत करण्याबाबत चर्चा करणार होत्या.
विमानाच्या आपत्कालीन लँडिंगमुळे आता त्यांच्या संपूर्ण दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तथापि, वित्त मंत्रालयाने सीतारामन सुरक्षित असल्याचे आणि त्यांच्या प्रवासाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.