हरियाणा: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी 17 मे रोजी युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्रासह पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांना देखील पोलीस अटक करत आहेत. नुकताच, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणा राज्यातून आणखी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव आहे मोहम्मद तारीफ. तावाडू येथून मोहम्मद तारीफला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोलिसांनी युट्यूबर ज्योती मल्होत्रासह नोमान, देवेंद्र, अरमानला अटक करण्यात आले आहे.
हेही वाचा: देशद्रोहाचा आरोप लागताच युट्युबर ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाऊंट निलंबित
माहितीनुसार, मोहम्मद तारिफ या तरुणावर स्थानिक हवाई दलाच्या स्टेशनशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी नागरिकांसोबत शेअर केल्याचा गंभीर आरोप आहे. 6 महिन्यांपूर्वी तारिफ त्याच्या वडिलांसोबत पाकिस्तानला गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. तसेच, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मोहम्मद तारिफच्या संपर्कात असलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांचीही नावे आहेत. त्यांना भारतासंदर्भात संवेदनशील माहिती मिळाल्याचा संशय आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहम्मद तारिफची कसून चौकशी केली जात आहे. यादरम्यान, पाकिस्तानमध्ये तारिफ कोणाच्या संपर्कात होता? त्यासोबतच, त्याने कुणाला गुप्त माहिती दिली आहे का? याचा देखील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा: LATUR MNC SCAM: लातूर महानगरपालिकेच्या व्यवस्थापकाचा पगारवाढीसाठी बनावट स्वाक्षरीसह शिक्का मारून सरकारची फसवणूक
मोहम्मद तारिफ हा बऱ्याच काळापासून भारतीय लष्कर आणि संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता. व्हिसा मिळवण्याच्या बहाण्याने मोहम्मद तारिफ लोकांसोबत संपर्क साधायचा आणि नंतर त्यांना सापळ्यात अडकवून गुप्तहेर नेटवर्कचा भाग बनवायचा, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. चौकशीदरम्यान, तो दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या आसिफ बलोच आणि जाफर यांना गुप्तचर माहिती पुरवत होता आणि त्या बदल्यात पैसे घेत होता, असे उघड झाले. अटकेपूर्वी, तारिफने त्याच्या मोबाईल फोनवरून अनेक चॅट्स डिलीट करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला वेळीच अटक केली.
मोहम्मद तारिफचा मोबाईल फोन तपासला असता त्यात पाकिस्तानी व्हॉट्सअॅप मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि लष्करी कारवायांबद्दलची माहिती आढळून आली. असेही म्हटले जात आहे की तो दोन वेगवेगळ्या सिम कार्डद्वारे पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात होता. आरोपी मोहम्मद तारिफ, आसिफ बलोच आणि जाफर यांच्याविरुद्ध देशद्रोह कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.