Fake ID Scam : सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेमिंगच्या युगात मुले सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या सायबर सुरक्षा शाखेने (I4C) या संदर्भात एक गंभीर इशारा जारी केला आहे. सायबर भामटे बनावट ओळखपत्रे (Fake IDs) वापरून मुलांशी मैत्री करत असून, त्यांच्या वैयक्तिक माहितीचा आणि फोटोंचा गैरवापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
कसा रचला जातोय जाळा?
हॅकर्स मुलांचे वय आणि आवड पाहून स्वतःची खोटी ओळख निर्माण करतात. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर संवाद साधून ते हळूहळू मुलांचा विश्वास संपादन करतात. एकदा का विश्वास बसला की, 'आपले बोलणे कोणाला सांगू नको, हे आपल्यातच गुपित राहू दे,' असे सांगून त्यांना भावनिक जाळ्यात ओढले जाते. या खाजगी संभाषणाच्या बहाण्याने मुलांकडून वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ मागवले जातात आणि नंतर त्याच फोटोंचा वापर करून मुलांना ब्लॅकमेल केले जाते.
हेही वाचा - Wingo App Scam : केंद्र सरकारची मोठी कारवाई; विंगो ॲपसह 50 यूट्यूब व्हिडिओ आणि Telegram चॅनेल्सवर बंदी
पालकांसाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे
या नवीन प्रकारच्या सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी सरकारने खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
गोपनीयता पाळा: मुलांना त्यांचे वय, शाळेचे नाव, घराचा पत्ता किंवा फोन नंबर सोशल मीडियावर शेअर करण्यापासून रोखा.
समुपदेशन करा: अनोळखी व्यक्तीशी ऑनलाइन संवाद साधणे किती धोक्याचे ठरू शकते, याचे मुलांना समुपदेशन करा.
फोटो शेअरिंगवर बंदी: कोणत्याही अनोळखी व्यक्तीला वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ पाठवू नका, हे मुलांना ठामपणे सांगा.
ब्लॉक करण्याचे धाडस: जो कोणी संवाद गुप्त ठेवण्याचे दडपण आणत असेल, त्याला त्वरित Block करण्यास मुलांना सांगा.
त्वरित तक्रार करा
अनेकदा मुले भीतीपोटी किंवा भावनिक दबावाखाली पालकांपासून गोष्टी लपवतात. यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावते. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवावे. जर एखादा असा प्रकार घडला असेल किंवा कोणी त्रास देत असेल, तर घाबरून न जाता त्वरित 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.