Saturday, February 14, 2026 04:20:48 AM

Union Budget 2026: बजेट सादर होण्यापूर्वी टेलिग्रामवर फोटो लीक; PIB ने केला मोठा खुलासा

सोशल मीडियावर केंद्रीय अर्थसंकल्प 2026 लीक झाल्याचे फोटो व्हायरल

union budget 2026 बजेट सादर होण्यापूर्वी टेलिग्रामवर फोटो लीक pib ने केला मोठा खुलासा

Union Budget 2026: सोशल मीडियावर केंद्रीय अर्थसंकल्प 2026–27 लीक झाल्याचे दावे जोर धरत असतानाच केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) या प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. व्हायरल होत असलेले अर्थसंकल्पाचे कथित स्कॅन केलेले दस्तऐवज बनावट असल्याचे PIB ने स्पष्ट केले असून, नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केंद्रीय अर्थसंकल्पाचे काही फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात होते. या फोटोंमध्ये 2026–27 च्या अर्थसंकल्पाचा मसुदा असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, PIB ने या दाव्यांची सखोल तपासणी केल्यानंतर हे फोटो खोटे असल्याचे सांगितले आहे.

PIB च्या माहितीनुसार, व्हायरल होणाऱ्या फोटोपैकी एक फोटो प्रत्यक्षात 2025–26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित आहे. त्या दस्तऐवजाच्या पहिल्या पानावर डिजिटल पद्धतीने वर्ष बदलून 2026–27 असे दाखवण्यात आले आहे. तर दुसरा फोटो पूर्णपणे संगणकीय पद्धतीने तयार करण्यात आला असून, त्याचा कोणत्याही अधिकृत अर्थसंकल्पीय कागदपत्राशी संबंध नाही.

PIB ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अर्थसंकल्पासारख्या संवेदनशील विषयावर पसरवली जाणारी चुकीची माहिती समाजात गोंधळ निर्माण करू शकते, असे PIB ने स्पष्ट केले. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची अधिकृत खातरजमा करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर अशा अफवांमुळे अनावश्यक चर्चा आणि गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा याबाबत विशेष दक्षता घेत आहेत.

याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना देशातील सुधारणा प्रक्रियेवर भर दिला आहे. भारत वेगवान सुधारणा मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ ही या सरकारची ओळख बनली असून, आता देश पुढील पिढीतील सुधारणांकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी खासदारांना सकारात्मक ऊर्जा वापरून या सुधारणा प्रक्रियेला गती देण्याचे आवाहन केले. भारताने वेगवान ‘रिफॉर्म एक्सप्रेस’ पकडली असून, येणाऱ्या काळात आर्थिक आणि संरचनात्मक सुधारणांवर भर राहील, असे संकेत त्यांनी दिले.

एकूणच, केंद्रीय अर्थसंकल्प लीक झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे PIB ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांपासून दूर राहून अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पुन्हा एकदा करण्यात आले आहे.

 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या