पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून महत्त्वपूर्ण चर्चा केली. या संवादादरम्यान प्रदेशात तातडीने संघर्षविराम लागू करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली. हिंसा तात्काळ थांबवून शांततेच्या दिशेने पावले उचलण्याचे आवाहन भारताने पुन्हा एकदा केल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशीही संवाद साधला. यूएईवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत जीवितहानीबद्दल शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्या. कठीण काळात भारत यूएईसोबत ठामपणे उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच यूएईमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले. तणाव कमी करणे, प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य यांना भारताचा पाठिंबा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
हेही वाचा: Dhurandhar 2 : धुरंधर 2 नोंदवणार भारतीय चित्रपटसृष्टीत नवा रेकॉर्ड ?; चित्रपटाचा कालावधी ठरतोय चर्चेचा विषय
दरम्यान, अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाईत इराणवर हल्ले केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. इराणी सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला असून काही वरिष्ठ नेतेही ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल इस्त्रायल तसेच आखाती प्रदेशातील काही भागांकडे क्षेपणास्त्र डागल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे व्यापक युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.
या अत्यंत संवेदनशील परिस्थितीत भारताने संतुलित आणि जबाबदार भूमिका घेत संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा आग्रह धरला आहे. प्रादेशिक स्थैर्य राखणे आणि निरपराध नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हीच काळाची गरज असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींकडे जगाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Iran Israel War: तेहरान हादरले; इस्रायलने हल्ला करून खामेनेईंपाठोपाठ 'या' मोठ्या नेत्यालाही संपवलं, मध्यपूर्वेत महायुद्धाचा भडका सुरूच