मुंबई: दिवाळीच्या सणात सोनं आणि चांदीची खरेदी नेहमीच उत्साहात केली जाते. मात्र, यंदा भाऊबीजच्या दिवशी सोन्या-चांदीच्या बाजारात अनपेक्षित बदल दिसून आला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत तेजीत असलेले दर आता घसरत चालले आहेत. गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यास सुरुवात केल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत संकेतांमुळे सोनं आणि चांदी दोन्हींच्या किमतीत घट झाली आहे.
गेल्या काही आठवड्यांत सोन्याने दिवाळीपूर्वी जबरदस्त तेजी दाखवली होती, मात्र आता त्याच्या किंमतींना उतरती कळा लागल्याचे दिसते. सोने बाजारात सोन्याच्या किमतीत सुमारे सहा हजार रुपयांची घसरण झाली असून, एकाच दिवसात इतकी मोठी घट क्वचितच पाहायला मिळते. सध्या सोन्याचा वायदा दर 1,22,806 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. दिवसभरात दरात काही प्रमाणात सुधारणा होऊन सुमारे 900 रुपयांची वाढ नोंदवली गेली असली तरी बाजार अजूनही दबावाखाली आहे.
सराफा बाजारातही काही वेगळं चित्र नाहीये. 22 कॅरेट सोनं 1,15,390 रुपये, तर 24 कॅरेट सोनं 1,25,880 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने उपलब्ध आहे. मात्र, दर कमी झाले असले तरी सामान्य जनतेला ते अजूनही ते महागच वाटत आहेत.
हेही वाचा: Bhaubeej 2025 : तुम्हाला सख्खा भाऊ नाईए? तरीही अशा पद्धतीनं करू शकता भाऊबीज साजरी; जाणून घ्या सविस्तर माहिती
चांदीच्या बाजारातही घसरण कायम आहे. सध्या एक किलो चांदीचा दर 1,59,900 रुपये इतका आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत दोन लाखांच्या जवळ पोहोचलेले दर आता घटले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चांदीचा पुरवठा वाढला आणि गुंतवणूकदारांनी नफा वसूल केल्याने दर कमी झाले असावेत. तरीही, 2025 या वर्षात चांदीने सुमारे 70 टक्के वाढ नोंदवली आहे. यामागे इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि सोलार पॅनल उत्पादनासाठी वाढती मागणी हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.
या घसरणीनंतरही तज्ज्ञांचे मत आहे की, सोनं आणि चांदी हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय राहतील. सध्याची किंमत घट ही तात्पुरती असल्याचे मानले जात असून, आगामी महिन्यांत लग्नसराई आणि वर्षअखेरच्या मागणीमुळे दर पुन्हा वाढू शकतात. गुंतवणूकदारांसाठी ही वेळ भावकपातीत खरेदीची चांगली संधी मानली जात आहे. त्यामुळे सणानंतरचा हा शांत बाजार लवकरच पुन्हा तेजीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: UPI Transactions: UPI झाला डिजिटल इंडियाचा ‘राजा’! ऑक्टोबरमध्ये दररोज 94,000 कोटींचे व्यवहार; सणासुदीचा हंगाम ठरला गेमचेंजर