Online Gaming Protest : पश्चिम दिल्लीतील सुभाष नगर चौकात ऑनलाइन आणि मोबाईल गेमिंगच्या वाढत्या व्यसनाधीनतेविरोधात आज तीव्र निषेध करण्यात आला. ऑनलाइन गेम्समुळे तरुण पिढी भरकटत चालल्याची भावना व्यक्त करत शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. आंदोलकांनी हातात विविध घोषणा लिहिलेले बॅनर धरले होते, ज्यावर "ऑनलाइन गेम्सवर बंदी घाला" आणि "ऑनलाइन गेम्स मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहेत" अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. या सभेला संबोधित करताना आंदोलनाचे नेतृत्व करणारे परमजीत सिंग पम्मा यांनी ऑनलाइन गेम्स हे आता मुलांसाठी 'घातक' ठरत असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली.
व्यसनाधीनता आणि हिंसक प्रवृत्तीचा धोका
परमजीत सिंग पम्मा यांनी यावेळी मुलांच्या बदलत्या मानसिकतेवर भाष्य केले. ते म्हणाले की, ऑनलाइन गेम्सचे व्यसन इतके टोकाचे झाले आहे की, जर पालकांनी मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर मुले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात किंवा आपल्याच कुटुंबावर हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ढकलणाऱ्या अशा धोकादायक अॅप्सवर सरकारने कडक लक्ष ठेवावे आणि त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे.
हेही वाचा - Govt Lawyers Pay Hike : सरकारी वकिलांसाठी आनंदाची बातमी! 11 वर्षांनंतर फीमध्ये मोठी वाढ; केंद्राकडून नवीन दर जाहीर
सोशल मीडियासाठी वयोमर्यादा आणि शाळांना सूचना
आंदोलकांनी केवळ गेमिंगच नव्हे, तर सोशल मीडियाच्या वापराबाबतही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. अनेक प्रगत देशांप्रमाणे भारतातही 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापराबाबत वयोमर्यादा निश्चित करावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली. याव्यतिरिक्त, शाळांनी मुलांना मोबाईलवर गृहपाठ देणे बंद करावे, अशीही मागणी करण्यात आली. गृहपाठाचे निमित्त करून मुले मोबाईल हातात घेतात आणि तासनतास विविध गेमिंग अॅप्समध्ये गुंतून राहतात, असे मत पालकांनी व्यक्त केले.
बेटिंग अॅप्स आणि पालकांना आवाहन
राष्ट्रीय अकाली दल महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा भावना धवन आणि रश्मीत कौर बिंद्रा यांच्यासह पम्मा यांनी ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराच्या खेळांवरही चिंता व्यक्त केली. हे खेळ केवळ मानसिकच नव्हे, तर आर्थिक नुकसानही करत आहेत. आंदोलकांनी पालकांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवून उद्यानांमध्ये खेळायाला पाठवावे आणि त्यांच्या मोबाईल वापरावर कडक नजर ठेवावी. ऑनलाइन गेमिंगच्या या 'सापळ्यातून' मुलांना बाहेर काढण्यासाठी समाज आणि सरकारने एकत्र येण्याची वेळ आली आहे, असा सूर या आंदोलनात उमटला.