Rahul Gandhi Diwali Celebration: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यंदाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली. पारंपारिक शुभेच्छा देण्याबरोबरच त्यांनी जुन्या दिल्लीतील ऐतिहासिक घंटेवाला स्वीट शॉपमध्ये जाऊन स्वतः मिठाई बनवण्याचा अनुभव घेतला. सोमवारी राहुल गांधींनी मिठाईच्या कारागिरांसोबत इमरती आणि बेसनाचे लाडू तयार केले. त्यांनी हा अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओद्वारे शेअर केला.
व्हिडिओमध्ये राहुल गांधी मिठाईच्या दुकानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना आणि लाडू बनवताना दिसतात. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मी जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध घंटेवाला स्वीट शॉपमध्ये इमरती आणि बेसनाचे लाडू बनवण्याचा प्रयत्न केला. या शतकानुशतके जुन्या दुकानाचा गोडवा अजूनही तसाच आहे. शुद्ध, पारंपारिक आणि हृदयाला भिडणारा. दिवाळीची खरा गोडवा फक्त ताटात नाही, तर नातेसंबंध टिकवण्यात आणि समाजात आहे.'
हेही वाचा - INS Vikrant: पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर जवानांसोबत साजरी केली दिवाळी
राहुल गांधींनी म्हटलं आहे की, तुम्ही सर्वजण तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात? ती खास कशी बनवत आहात, आम्हाला नक्की सांगा. दरम्यान, मिठाईच्या दुकानाच्या मालकाशी झालेल्या गप्पांदरम्यान एक मजेशीर प्रसंग घडला. दुकानदाराने राहुल गांधींशी संवाद साधताना म्हटलं की, 'आम्ही तुमचे आजोबा नेहरूजी, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी आणि बहीण प्रियंका गांधी यांना सेवा दिली आहे. आता आम्ही फक्त तुमच्या लग्नाची वाट पाहतोय! लवकर लग्न करा, त्यावेळी मिठाई आमच्याकडूनच घ्या.'
हेही वाचा - 8th Pay Commission Approved: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगारा संदर्भातील मोठी बातमी; 8वा वेतन आयोगाचा ‘तो’ निर्णय कधी जाहीर होणार?
दरम्यान, हे ऐकून राहुल गांधी हसले, मात्र त्यांनी यावर काहीही उत्तर दिलं नाही. सोशल मीडियावर राहुल गांधींचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.