Thursday, November 13, 2025 02:52:37 PM

Rajnath Singh: ‘सेनेला जाती-धर्मात विभागू नका’, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा राहुल गांधींवर निशाणा

या वक्तव्यांमुळे देशभरात नव्याने वाद पेटला असून राजकारणात आरक्षण आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

rajnath singh ‘सेनेला जाती-धर्मात विभागू नका’ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा राहुल गांधींवर निशाणा

पटना : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. राहुल गांधी यांनी अलीकडेच बिहारमधील सभांमध्ये केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना राजनाथ सिंह म्हणाले की, “राहुल गांधी सशस्त्र दलांमध्ये आरक्षणाची मागणी करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.” राहुल गांधी यांनी आपल्या सभांमध्ये असा दावा केला होता की देशातील सशस्त्र सेना, न्यायपालिका, नोकरशाही आणि खासगी क्षेत्रांमध्ये मागासलेल्या जाती, आदिवासी समाज आणि अल्पसंख्याकांचे प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. फक्त 10 टक्के लोकसंख्या या सर्व संस्थांवर नियंत्रण ठेवते, असे त्यांनी म्हटले होते.

यावर प्रतिक्रिया देताना राजनाथ सिंह म्हणाले, “राहुल गांधींना काय झाले आहे? ते लष्करात आरक्षणाची मागणी करत आहेत. लष्करातील सैनिकांचा धर्म फक्त ‘सैन्य धर्म’ आहे. त्यांचा एकच उद्देश आहे तो म्हणजे देशसेवा! आमच्या सैन्याला राजकारणात ओढू नका.” त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पक्षही आरक्षणाचा विरोधक नाही. “आम्ही गरीबांना आरक्षण दिले आहे. पण लष्कराला जाती, धर्म किंवा पंथाच्या आधारावर विभागणे योग्य नाही,” असे सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांनी पुढे सांगितले की, “या देशाने जेव्हा जेव्हा संकटाचा सामना केला, तेव्हा आपल्या सैनिकांनी शौर्याने भारताचा तिरंगा उंचावला आहे. जाती, धर्म आणि पंथाच्या राजकारणाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. आमचे विचार असे आहेत की सर्व समाजघटकांचा विकास व्हावा आणि कोणाचाही भेदभाव होऊ नये.”

हेही वाचा: Multiplex Overcharging Rates: 50 रुपयांचे कोल्डड्रिंक 400 रुपयांना देता? मल्टिप्लेक्समधील मनमानी दरांवर सर्वोच्च न्यायालयाने ओढले ताशेरे

सिंह यांनी बिहारमधील जमुई येथे आयोजित सभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ चा उल्लेख करत भारतीय लष्कराचे कौतुक केले. “या ऑपरेशनदरम्यान प्रमुख दहशतवादी ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत. हे अभियान थांबले आहे, संपलेले नाही. भारत आता दुर्बल देश नाही. कोणी उचकावले तर प्रत्युत्तर नक्की मिळेल,” असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आर्थिक विषमता आणि समाजातील प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले की, “देशातील 90 टक्के लोकसंख्या दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि इतर वंचित समाजातून येते, पण प्रमुख संस्था आणि पदांवर त्यांचे प्रमाण कमी आहे.”

दरम्यान, भाजपच्या मित्रपक्ष लोक जनशक्ती पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “सेनेला जाती-धर्माच्या चष्म्यातून पाहणे लाजिरवाणे आणि दुर्दैवी आहे. भारतीय सेना ही संपूर्ण देशाची आहे. तिला राजकारणात ओढणे म्हणजे सैनिकांचा अपमान आहे,” असे पासवान यांनी पटण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, “लष्करावर अशा प्रकारे टिप्पणी करणे देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. विरोधी पक्षनेत्यानेच जर अशा विचारांनी सेना पाहिली, तर त्याहून दुर्दैवाची गोष्ट दुसरी नाही.”

हेही वाचा: Uber Metro Ticket Booking: मेट्रो प्रवासासाठी रांगेचा त्रास संपला; डिजिटल मेट्रो तिकीटिंगसाठी उबरची मुंबईमध्ये नवी सुविधा

 

सम्बन्धित सामग्री