Sunday, February 08, 2026 06:34:52 AM

Ravi Pujari Arrested : कोरिओग्राफर रेमो डिसूझाला खंडणी मागितल्याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारी अटकेत; मुंबई पोलिसांची कारवाई

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रवि पुजारीने सत्येंद्र त्यागी यांच्या सांगण्यावरून डिसूझा कुटुंबाला धमक्या दिल्या होत्या.

ravi pujari arrested  कोरिओग्राफर रेमो डिसूझाला खंडणी मागितल्याप्रकरणी गँगस्टर रवी पुजारी अटकेत मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्याकडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात गँगस्टर रवि पुजारी याला अखेर अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी, 2018 मध्ये पुजारीने रेमो डिसूझा यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

रवि पुजारीला पाच वर्षांपूर्वी सेनेगलमधून भारतात आणण्यात आले होते आणि तेव्हापासून तो कारागृहात होता. मात्र या विशिष्ट खंडणी प्रकरणात त्याची औपचारिक अटक झालेली नव्हती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी, 22 जानेवारी रोजी त्याला एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पुजारीला 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रवि पुजारीने सत्येंद्र त्यागी यांच्या सांगण्यावरून डिसूझा कुटुंबाला धमक्या दिल्या होत्या. सत्येंद्र त्यागी हे नाव यापूर्वीही या प्रकरणातील आरोपी म्हणून समोर आले आहे. पुजारीने ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2018 या कालावधीत रेमो डिसूझा, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मॅनेजरला वारंवार फोन करून धमकावल्याचा आरोप आहे.

हेही वाचा: Nashik : मोठी बातमी! 400 कोटींच्या कंटेनर लुटीप्रकरणी ठाण्यातील बिल्डर संशयाच्या भोवऱ्यात, तरुणाने केला खुलासा

या काळात पुजारीने रेमो डिसूझा यांच्यावर एका चित्रपटाचे काम लवकर पूर्ण करून रिलीज करण्यासाठी दबाव टाकल्याचे तपासात समोर आले आहे. वाद मिटवण्यासाठी त्याने 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या धमक्यांमुळे डिसूझा कुटुंब मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याचेही तपासात नमूद करण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची मुळे 2018 मध्ये झालेल्या एका व्यावसायिक करारात आहेत. रेमो डिसूझा आणि सत्येंद्र त्यागी यांच्यात ‘अमर मस्ट डाए’ या चित्रपटासंदर्भात करार झाला होता. मात्र नंतर चित्रपटाचे हक्क आणि आर्थिक व्यवहारांवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

सत्येंद्र त्यागी यांनी या चित्रपटात गुंतवणूक केल्याचा दावा करत रेमो डिसूझा यांनी पाच कोटी रुपये हडपल्याचा आरोप केला होता. त्यानंतरच रवि पुजारीकडून धमक्यांचा आणि खंडणीचा सिलसिला सुरू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जवळपास आठ वर्षांनंतर या प्रकरणात गँगस्टर रवि पुजारीची अटक झाल्याने तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Ind Vs NZ 2nd T20: फक्त 48 बॉल आणि धावा 122... सूर्या-ईशानच्या जोडीने न्यूझीलंडला रडकुंडीला आणलं


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या