मध्य प्रदेशातील देवास शहरात दु:खद घटना घडली आहे. भारताचे प्रतिनिधित्व केलेली आंतरराष्ट्रीय ज्यू-जित्सू खेळाडू आणि मार्शल आर्ट्स प्रशिक्षक रोहिणी कलम हिचा मृतदेह तिच्या घरी आढळल्याने एकच खळबळ माजली. वयाच्या केवळ 35 व्या वर्षी तिचे निधन झाले असून, प्राथमिक तपासात आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रोहिणी कलम हिच्या धाकट्या बहिणीने, रोश्नीने, तिला खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिले. तिने तात्काळ कुटुंबीयांना याची माहिती दिली. तत्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी रोहिणी मृत असल्याचे घोषित केले. घटना घरीच, अर्जुन नगर, राधागंज परिसरातील निवासस्थानी घडली.
घटनेच्या वेळी रोहिणीची आई आणि धाकटी बहीण मंदिरात गेलेल्या होत्या. तर वडीलसुद्धा घराबाहेर होते. पोलिसांनी सांगितले की घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. त्यामुळे मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास सध्या सुरू आहे.
हेही वाचा: India Vs Bangladesh : भारत विरुद्ध बांगलादेश क्रिकेट सामना; पावसाने खेळ बिघडवला; भारताचा खात्रीशीर विजय हातातून गेला
बहिण रोश्नीने पोलिसांना सांगितले की रोहिणी गेल्या काही काळात कामाच्या तणावाखाली होती. ती आस्था येथील एका खासगी शाळेत मार्शल आर्ट्स कोच म्हणून कार्यरत होती. शाळेतील काही सहकारी तसेच मुख्याध्यापकांकडून तिला त्रास दिला जात असल्याचेही रोश्नीने सांगितले.
रोश्नीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी रोहिणीने नेहमीप्रमाणे चहा आणि नाश्ता केला व कोणाशीतरी फोनवर चर्चा केली. त्या संभाषणादरम्यान ती भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसत होते. फोन कॉलनंतर तीने आपल्याच खोलीत जाऊन दरवाजा बंद केला आणि ही दुःखद घटना घडली.
अंत्यत कौशल्यवान खेळाडू म्हणून रोहिणीने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उज्ज्वल केले होते. तिच्या निधनाने क्रीडा क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तपासणी सुरू ठेवली असून, कुटुंबीयांच्या मदतीने पुढील माहिती गोळा केली जात आहे.
हेही वाचा: Phaltan Doctor Death Case: चार महिने त्यांच्यात..., आरोपी बदनेसोबतचा वाद काय?; वकिलांचा न्यायालयात खळबळजनक दावा