Rupee vs Dollar: अलिकडच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सतत वाढत आहे. केवळ डॉलरच नाही तर ब्रिटिश पाउंड, युरो आणि येनच्या तुलनेत रुपयाही कमकुवत होत आहे. 15 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीचा विचार केला तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, या काळात ब्रिटिश पाउंडच्या तुलनेत रुपया सर्वात जास्त कमकुवत झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून डॉलरच्या तुलनेत रुपया सतत कमकुवत होत आहे. 6 फेब्रुवारी 2025 ला रुपया 14 पैशांनी घसरून 87.57 रुपये प्रति डॉलर या नवीन नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यामुळे आता सर्वसामान्यांना देखील प्रश्न पडू लागला आहे की, रुपया सतत कमकुवत का होत आहे? डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने कोणते फायदे आणि तोटे होतात? या सर्व प्रश्नांची उत्तर या लेखातून जाणून घेऊयात.
हेही वाचा - महिला सन्मान बचत योजनेसाठी शेवटची संधी! गुंतवणुकीसाठी फक्त 31 मार्चपर्यंत वेळ
डॉलरच्या तुलनेत रुपया का कमकुवत होत आहे?
रुपया कमकुवत होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही कारणे समाविष्ट आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे जागतिक स्तरावर टॅरिफ युद्धाची भीती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम रुपयावरही दिसून येतो. तसेच अमेरिकेत व्याजदर आणि बाँड उत्पन्न खूप जास्त आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकन बाजाराकडे वळत आहेत. यामुळे डॉलर मजबूत होत आहे. याशिवाय, भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार (एफआयआय) सतत विक्री करत आहेत. यामुळे डॉलरची मागणी वाढत आहे, ज्यामुळे रुपया कमकुवत होत आहे. तथापी, चीनसारख्या देशांसोबत भारताची व्यापार तूट सतत वाढत आहे. यामुळे रुपया कमकुवत होत आहे आणि डॉलर मजबूत होत आहे.
हेही वाचा - शेअर बाजारात मोठी तेजी! गुंतवणूकदारांना अवघ्या काही तासांत साडे चार लाख कोटींचा नफा
रुपया कमकुवत झाल्याने होणारे तोटे -
तेल आणि पेट्रोलियम उत्पादने महाग होतील: भारत हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. जेव्हा रुपया घसरतो तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. याचा परिणाम वाहतूक, रसद आणि महागाईवर होतो.
महागाई वाढ होण्याची शक्यता: रुपयाच्या कमकुवतपणामुळे आयात केलेल्या वस्तू महाग होतात, ज्यामुळे महागाई वाढते. इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल आणि औषधांच्या किमती वाढू शकतात.
परदेशी कर्जे, शिक्षण आणि प्रवास महाग होतील: जर एखाद्या भारतीय कंपनीने डॉलरमध्ये कर्ज घेतले तर तिला जास्त व्याज द्यावे लागेल. जे अमेरिका, युरोप किंवा इतर देशांमध्ये शिक्षण घेत आहेत, त्यांचा खर्च वाढू शकतो. परदेशी प्रवास आणि हॉटेल बुकिंग महाग होतील.
रुपया कमकुवत झाल्याने होणारे फायदे -
निर्यातीला चालना मिळेल: जेव्हा रुपया घसरतो तेव्हा भारताची निर्यात स्वस्त होते, ज्यामुळे परदेशी खरेदीदार अधिक वस्तू मागवतात. याचा फायदा आयटी क्षेत्र, औषधनिर्माण आणि उत्पादन कंपन्यांना होऊ शकतो.
पर्यटनाला चालना मिळेल: जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा परदेशी पर्यटक भारतात जास्त खर्च करतात, ज्यामुळे पर्यटन क्षेत्राला फायदा होतो.
दरम्यान, रुपयाची घसरण हा देशासमोरील एक चिंतेचा विषय आहे. असं असलं तरी रुपया घसरल्याने निर्यात वाढवण्याच्या संधीही खुल्या होतात. भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी ही चांगली गोष्ट आहे. परंतु, यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत महागाई वाढण्याचा त्यापासून धोका देखील उद्धवू शकतो. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर रुपयाच्या घसरणीमुळे काही क्षेत्रांना नुकसान होऊ शकते, परंतु त्याचा काही क्षेत्रांना फायदाही होतो.