नवी दिल्ली: जागतिक राजकीय तणावाचा थेट परिणाम भारतीय चलनावर दिसून येत असून बुधवारी, 4 मार्च 2026 रोजी रुपयाने डॉलरसमोर ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठली. आंतरबँक विदेशी चलन बाजारात (Interbank Foreign Exchange Market) भारतीय रुपया 69 पैशांनी घसरत एक अमेरिकी डॉलरमागे 92.18 या पातळीवर पोहोचला. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता यामागे प्रमुख कारण असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे.
व्यापाराच्या सुरुवातीला रुपया 92.05 या पातळीवर उघडला, मात्र काही वेळातच तो आणखी घसरून 92.18 या नीचांकी स्तरावर गेला. यापूर्वी 2 मार्च रोजी रुपया 91.49 या पातळीवर बंद झाला होता. होळीच्या सुट्टीमुळे मंगळवारी विदेशी चलन बाजार बंद होता, त्यामुळे बुधवारी बाजार उघडताच रुपयावर दबाव अधिक स्पष्टपणे दिसून आला.
परकीय चलन बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय चलनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. जागतिक बेंचमार्क मानले जाणारे Brent Crude फ्युचर्स बाजारात 82 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहे. इराणवरील संकट आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली असून त्याचा परिणाम चलन बाजारावरही होत आहे.
हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: 'कप्तानने ठोक दिया...'; भर पत्रकार परिषदेत ऑडिओ क्लिप ऐकवून रोहित पवारांचा खळबळजनक दावा
दरम्यान, जागतिक स्तरावर डॉलरची ताकदही वाढताना दिसत आहे. प्रमुख सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा US Dollar Index सुमारे 0.03 टक्क्यांनी वाढून 99.08 या पातळीवर व्यवहार करत होता. जागतिक अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळतात, त्यामुळे डॉलरची मागणी वाढत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढणे ही चिंतेची बाब मानली जाते. कारण भारत आपल्या इंधन गरजेपैकी सुमारे 85 टक्के गरज आयातीद्वारे भागवतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्यास देशाच्या आयात बिलावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते, जर पश्चिम आशियातील तणाव कायम राहिला आणि तेलाच्या किमती आणखी वाढल्या, तर रुपयावरचा दबाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो. याचा परिणाम शेअर बाजार, व्यापार संतुलन आणि महागाईवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष आता जागतिक घडामोडी आणि ऊर्जा बाजारातील हालचालींकडे लागले आहे.
हेही वाचा: Rohit Pawar: 'अजितदादांच्या विमान अपघातापूर्वी बारामती विमानतळावर रेकी...'; रोहित पवारांचा चौथ्या पत्रकार परिषदेत सर्वात मोठा दावा