२८ सप्टेंबर, २०२४, उत्तर प्रदेश : हाथरस येथील एका शाळेने विद्यार्थ्याचा नरबळी दिला आहे. शाळेच्या प्रगतीसाठी विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक नाना त-हेचे प्रयत्न करत असतात. शाळा नावारुपाला यावी, यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील शाळेच्या संचालकाने संस्थेच्या आणि आपल्या कुटुंबाच्या समृद्ध प्रगतीसाठी दुसरीत शिकणाऱ्या कोवळ्या निष्पाप विद्यार्थ्यांचा 'नरबळी' दिला. या मुख्याध्यापकाचे वडील तंत्रविद्येतील माहीतगार असून, त्यांच्या सांगण्यावरूनच विद्यार्थ्यांचा गळा आवळून खून करण्यात आला. पोलिसांनी शाळेचा मालक, संचालक, मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना अटक केली आहे.
शाळेच्या संचालकावर मोठे कर्ज होते. नरबळी दिल्याने शाळा भरभराटीला येईल आणि आपल्यावरील सर्व संकटे दूर होतील. शिवाय घराचीही काळजी चिंता मिटेल, अशी शाळेच्या मालकाची म्हणजेच संचालक दिनेश बघेल याचे वडील जसोधन सिंह यांची अंधश्रद्धा होती. त्यातूनच हे हत्याकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले.