मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मंगळवार, 3 फेब्रुवारीची सकाळ खऱ्या अर्थाने 'सुवर्णसकाळ' ठरली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या बातमीकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले होते, ती अखेर येऊन धडकली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील एका महत्त्वपूर्ण फोन कॉलने बाजाराचे चित्रच पालटवून टाकले आहे. ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्कात (Tariff) कपात करून ते 18 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याची घोषणा केली आणि दलाल स्ट्रीटवर उत्साहाचे वारे वाहू लागले.
सेन्सेक्स-निफ्टीची ऐतिहासिक गरुडझेप
'देर आए दुरुस्त आए' या उक्तीचा प्रत्यय आज शेअर बाजारात आला. ट्रम्प यांच्या घोषणेचा आनंद बाजाराच्या ओपनिंगला स्पष्टपणे दिसून आला. प्री-ओपनिंग सेशनमध्येच मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने तब्बल 3,800 अंकांची उसळी घेतली, तर निफ्टीने 1,400 अंकांच्या वर उसळी घेत 5 टक्के वाढीसह दमदार सुरुवात केली. सेन्सेक्सनेही 3 टक्के वाढीसह खाते उघडले. बाजार उघडताच खरेदीचा असा काही पूर आला की, पहिल्या काही मिनिटांतच ऑटो, फार्मा आणि टेक्सटाईल यांसारखी सर्वच क्षेत्रे हिरवीगार झाली. केवळ शेअर्सच नव्हे, तर भारतीय रुपयानेही डॉलरच्या तुलनेत मोठी मुसंडी मारली आहे.
काय आहे भारत-अमेरिका व्यापार करार?
गुंतवणूकदारांनी ज्याचे स्वागत केले, त्या ऐतिहासिक व्यापार कराराचे तपशीलही तितकेच रंजक आहेत. या करारांतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील परस्पर शुल्क 25 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. त्याबदल्यात, भारतानेही अमेरिकन वस्तूंवरील शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे चक्क 0 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे मान्य केले आहे. ही 'विन-विन' (Win-Win) परिस्थिती असल्यामुळे आणि दोन्ही देशांतील व्यापार संबंधावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे, सोमवारी रात्री उशिरा गिफ्ट निफ्टीने 600 हून अधिक अंकांनी वधारूनच या तेजीचे संकेत दिले होते.
हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : आता बळीराजाच्या डोक्यावरील कर्जाचं डोंगर कमी होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा
मंदीचे ढग हटले, एफआयआयचा ओघ वाढणार?
गेल्या काही महिन्यांपासून हा करार रखडल्यामुळे बाजारात मंदीचे सावट होते. सप्टेंबर 2025 मध्ये होणारा हा करार लांबणीवर पडल्याने, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) जानेवारी 2026 मध्ये तब्बल 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक काढून घेतली होती, ज्यामुळे निफ्टी 1,000 अंकांनी घसरला होता. मात्र, आजच्या या एका सकारात्मक बातमीने बाजारातील सर्व नकारात्मकता पुसून टाकली आहे. अमेरिकेसारखी प्रमुख बाजारपेठ आता भारतीय वस्तूंसाठी अधिक खुली झाल्याने परदेशी गुंतवणुकीचा ओघ पुन्हा वाढण्याची चिन्हे आहेत.
गुंतवणूकदारांनो, 'या' शेअर्सवर ठेवा नजर
आता प्रश्न उरतो तो म्हणजे, या तेजीचा थेट फायदा कोणाला होणार? तज्ज्ञांच्या मते, शुल्क कपातीमुळे भारताच्या कापड (Textile) आणि मत्स्यपालन (Aquaculture) क्षेत्राला 'अच्छे दिन' येणार आहेत. विशेषतः गोकुळदास एक्सपोर्ट्स, पर्ल ग्लोबल, केपीआर मिल्स आणि वेल्सपन लिव्हिंग यांसारख्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या स्टॉक्सवर मंगळवारी गुंतवणूकदारांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारतीय कापडाला आता मोठी मागणी मिळण्याची शक्यता असल्याने हे शेअर्स भविष्यातही प्रकाशझोतात राहण्याची शक्यता आहे.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
हेही वाचा: BMC Announces Fines: आता रस्त्यावर थुंकल्यास पाकीट होणार रिकामं; मुंबई महापालिकेचे 'हे' नियम नक्की वाचा