Central Vista Project : देशाच्या राजधानीतील ऐतिहासिक आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील प्रख्यात कृषी भवन आणि शास्त्री भवन या इमारती आता इतिहासजमा होणार असून, त्या जागी आधुनिक 'कॉमन सेंट्रल सेक्रेटरीएट' (CCS) उभारले जाणार आहे. या भव्य प्रकल्पासाठी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) सोमवारी 3,006 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
कसे असेल नवे 'प्रशासकीय केंद्र'?
निविदा प्रक्रियेनुसार, कृषी भवन आणि शास्त्री भवनचे सर्व विभाग (A ते G) पूर्णपणे जमीनदोस्त केले जातील. त्या जागी 'CCS 4' आणि 'CCS 5' या दोन अद्ययावत इमारती उभ्या राहतील. या दोन्ही इमारती प्रत्येकी 8 मजली असतील. बांधकामासाठी आधुनिक 'पीईबी' (Pre-Engineered Building) स्टील तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या इमारतींचे काम पुढील 2 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, 5 वर्षांच्या देखभालीचा करारही यात समाविष्ट आहे.
हेही वाचा - CBSE Exam Admit Card: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; CBSE हॉल तिकीट 'या' लिंकवर होणार उपलब्ध, डाउनलोड करण्याची सोपी पद्धत पाहा
फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मंत्रालयांचे स्थलांतर
सध्या या जुन्या इमारतींमध्ये महत्त्वाची मंत्रालये कार्यरत आहेत. या कार्यालयांचे स्थलांतर नव्याने बांधण्यात आलेल्या 'कर्तव्य भवन' (इमारत 1, 2 आणि 3) मध्ये सुरू झाले आहे. या प्रकल्पात संरक्षण मंत्रालयाला सर्वाधिक 225 खोल्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय माहिती व प्रसारण मंत्रालयाला 120, कायदा मंत्रालयाला 110 आणि शिक्षण मंत्रालयाला 50 हून अधिक खोल्यांचे वाटप झाले आहे. नवीन इमारतीच्या ग्राउंड आणि पहिल्या मजल्यावरील 12 खोल्या सीबीआयसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
जुना वारसा आणि नवे स्वरूप
कृषी भवनमध्ये सध्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालये आहेत, तर शास्त्री भवनमध्ये शिक्षण, संस्कृती आणि माहिती व प्रसारण यांसारखे महत्त्वाचे विभाग आहेत. बजेट सत्राच्या सुट्टीचा फायदा घेऊन फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सर्व स्थलांतर पूर्ण करण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले आहे. यानंतर खऱ्या अर्थाने पाडकाम आणि नवीन बांधकामाला वेग येईल.