Fake Death Case: कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा प्रत्यय आग्रा येथील एका घटनेतून आला आहे. स्वतःविरुद्धचा खटला बंद करण्यासाठी बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर करून प्रशासनाला तब्बल 12 वर्षे गुंगारा देणारा तारा चंद्र शर्मा अखेर कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे. एका स्कूटरने या गुन्हेगाराचे वर्षानुवर्षांचे रहस्य उघड केले असून, आता त्याच्यावर न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बनावट मृत्यू प्रमाणपत्राचा असा रचला होता डाव
आग्रा येथील न्यू आग्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तारा चंद्र शर्मा यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल होता. अटक टाळण्यासाठी आणि अजामीनपात्र वॉरंटमधून सुटका करून घेण्यासाठी त्याने 2013 मध्ये एक धक्कादायक खेळी खेळली. त्याने महानगरपालिकेतून चक्क स्वतःचेच मृत्यू प्रमाणपत्र मिळवून ते न्यायालयात सादर केले. या बनावट प्रमाणपत्रात त्याचा मृत्यू 1998 मध्येच झाल्याचे दाखवण्यात आले होते. न्यायालयाने या कागदपत्रावर विश्वास ठेवून त्यावेळची कायदेशीर कार्यवाही बंद केली होती.
हेही वाचा - Thief Files Complaint : ऐकावं ते नवलचं! चोरी करायला गेलेल्या चोराचीच पोलिसांत धाव; मारहाण करणाऱ्यांविरुद्ध दाखल केला FIR
स्कूटरच्या एका फोटोने उघड झालं सत्य
तारा चंद्रचा हा बनाव 12 वर्षे यशस्वीपणे सुरू होता, मात्र नोव्हेंबर 2025 मध्ये त्याचे नशीब फिरले. प्रकरणातील वादी राजकुमार वर्मा यांनी तारा चंद्रला गांधी नगर भागात चक्क स्कूटर चालवताना पाहिले. राजकुमार यांनी प्रसंगावधान राखत त्याच्या स्कूटरचा फोटो काढला आणि आरटीओ (RTO) कार्यालयातून माहिती काढली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या व्यक्तीला न्यायालयाने 1998 मध्ये मृत मानले होते, त्याने 2016 मध्ये स्वतःच्या नावे नवीन स्कूटरची नोंदणी केली होती.
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांचा तपास सुरू
राजकुमार वर्मा यांनी हे सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास केला असता, कागदोपत्री 'मृत' असलेला तारा चंद्र शर्मा प्रत्यक्षात जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी नव्याने तपास सुरू केला असून, केवळ जुना खटलाच नाही तर फसवणूक, बनावटगिरी आणि न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल आरोपीवर अतिरिक्त कलमान्वये गुन्हे दाखल केले जाणार आहेत.