मुंबई : भारतीय महिला क्रिकेटपटू प्रतीका रावल हिला अखेर ICC महिला क्रिकेट विश्वचषक विजेतेपदाचा मेडल मिळणार आहे. हे शक्य झाले आहे बीसीसीआय सचिव जय शाह यांच्या हस्तक्षेपामुळे. प्रतीकाने स्वतः या गोष्टीची माहिती दिली आहे. प्रतीका रावलला बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की तिला संपूर्ण स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. तिच्या जागी संघात शेफाली वर्मा हिला संधी देण्यात आली. शेफालीने नंतर फायनल सामन्यात 87 धावांची झळाळती खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आयसीसीच्या नियमानुसार, विजेता संघातील केवळ 15 खेळाडूंनाच अधिकृत विश्वचषक मेडल दिले जाते. पण प्रतीका रावलच्या प्रकरणात आयसीसीला आपला नियम बदलावा लागला. कारण ती स्पर्धेदरम्यान जखमी झाल्याने पुढील सामने खेळू शकली नव्हती, तरी तिच्या योगदानामुळे भारताने लीग फेरीत महत्त्वाचा विजय मिळवला होता. प्रतीका रावलने लीग सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली होती. तिने एक शतक ठोकत 300 हून अधिक धावा केल्या आणि स्मृती मंधानासोबत अनेक मोठ्या भागीदाऱ्या केल्या होत्या. पण दुखापतीमुळे ती अंतिम सामन्यात खेळू शकली नाही, आणि त्यामुळे तिला विजयाच्या मेडलपासून वंचित राहावे लागले.
हेही वाचा: माझ्या जवळ आला आणि...बांगलादेशच्या माजी महिला कर्णधाराचा निवडकर्त्यावर लैंगिक छळाचा आरोप
जेव्हा प्रतीका रावलचे नाव मेडलधारकांच्या यादीत नव्हते, तेव्हा सोशल मीडियावर चाहत्यांनी आयसीसीवर दबाव आणला. सर्वांनी तिच्या योगदानाची दखल घेण्याची मागणी केली. या प्रकरणात जय शाह यांनी हस्तक्षेप केला आणि आयसीसीशी चर्चा करून प्रतीकाला तिचा हक्काचा मेडल देण्याची व्यवस्था केली. तिने सांगितले की, “जय शाह यांनी आमच्या टीम मॅनेजरला मेसेज पाठवला आणि सांगितले की ते माझ्यासाठी मेडल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर आता माझ्याकडे माझे स्वतःचे मेडल आहे. जेव्हा मी पहिल्यांदा ते उघडले आणि पाहिले, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले. मी फार भावुक स्वभावाची नाही, पण तो क्षण खूपच खास होता.”
तिने पुढे सांगितले की, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीदरम्यान मी ज्या मेडलसह फोटो काढला होता, ते मेडल खरं तर आमच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याने तात्पुरते मला दिले होते. जय शाह यांनी मला आधीच आश्वासन दिले होते की तिचं मेडल लवकरच मिळेल, फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल.” प्रतीका रावलने सांगितले की, “जय शाह यांनी आयसीसीकडे विचारणा केली आहे की ते मेडल पाठवू शकतात का. त्यामुळे माझे मूळ मेडल आता येत आहे. सपोर्ट स्टाफमधील सदस्याने मला तात्पुरते आपले मेडल दिले, पण आता माझ्याकडे माझं स्वतःचा विजयाचं प्रतीक असलेले लवकरच मेडल येत आहे.”
प्रतीका रावलचा हा प्रवास केवळ एका खेळाडूच्या मेहनतीचा नव्हे, तर तिच्या अढळ आत्मविश्वासाचा आणि भारतीय संघाच्या एकतेचे प्रतीक आहे. तिच्या जिद्दीने हे सिद्ध केले आहे की खरी मेहनत आणि योगदान कधीच वाया जात नाही. आयसीसीकडून मिळणारे हे मेडल तिच्यासाठी केवळ सन्मानच नव्हे, तर तिच्या समर्पणाचा विजय आहे आणि जय शाह यांच्या पुढाकारामुळे हा न्याय अखेर मिळाला आहे. भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी हा प्रसंग प्रेरणादायी ठरेल.
हेही वाचा: IND vs PAK Hong Kong Sixes: भारत विरुद्ध पाकिस्तान हाँगकाँग सिक्स सामना सुरू; पाकिस्तानने जिंकली नाणेफेक