नवी दिल्ली: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. दरवर्षी मोठ्या संख्येने उमेदवार विविध भरती परीक्षांना सामोरे जातात. मात्र, अनेक वेळा चुकीचे प्रश्न, अस्पष्ट मांडणी किंवा तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. या पार्श्वभूमीवर कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission, SSC) परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ही नवीन व्यवस्था 2026 पासून लागू होणार असून, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
SSC ने संगणक आधारित परीक्षांसाठी ‘आक्षेप व्यवस्थापन प्रणाली’ (Objection Management System) लागू करण्याची घोषणा केली आहे. या नव्या प्रणालीमुळे परीक्षेनंतर उमेदवारांना आपल्या शंका आणि तक्रारी नोंदवण्याची अधिकृत संधी मिळणार आहे. जर परीक्षेत एखादा प्रश्न चुकीचा, अपूर्ण किंवा अस्पष्ट असल्याचे आढळले, तर तो प्रश्न रद्द केला जाईल आणि त्याचे पूर्ण गुण सर्व उमेदवारांना दिले जातील. त्यामुळे चुकीच्या प्रश्नांमुळे गुण गमावण्याची भीती आता राहणार नाही.
हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण तक्रारी, माहिती अधिकारा अंतर्गत आलेल्या अर्ज आणि न्यायालयीन निरीक्षणांनंतर घेण्यात आला आहे. अलीकडच्या काही परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिकेतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलनही केले होते. त्यामुळे SSC चा हा निर्णय परीक्षा व्यवस्थेला अधिक न्याय्य बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.
हेही वाचा: 8th Pay Commission: कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या भाग्याचा आज फैसला! आठव्या वेतन आयोगाची महत्त्वाची बैठक; सॅलरी आणि पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ?
नवीन नियमानुसार, परीक्षा संपल्यानंतर एसएससीकडून प्रथम तात्पुरती उत्तरतालिका (Provisional Answer Key) जाहीर केली जाईल. उमेदवार या उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवू शकतील. त्यानंतर विषयतज्ज्ञांकडून या आक्षेपांची सखोल तपासणी केली जाईल आणि अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) प्रसिद्ध केली जाईल. यामुळे चुकीच्या उत्तरांमध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, एखाद्या प्रश्नाचे एकापेक्षा अधिक योग्य उत्तर असल्यास, योग्य पर्याय निवडणाऱ्या सर्व उमेदवारांना पूर्ण गुण दिले जातील. मात्र, चुकीचे उत्तर देणाऱ्यांसाठी निगेटिव्ह मार्किंगचा नियम कायम राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अचूक उत्तर देण्याचे महत्त्वही तितकेच राहणार आहे.
तसेच, अभ्यासक्रमाबाहेरील (Out of Syllabus) प्रश्न विचारले गेल्यास ते प्रश्नही रद्द करण्यात येतील आणि सर्व उमेदवारांना त्याचे पूर्ण गुण दिले जातील. SSC ने स्पष्ट केले आहे की असे प्रकार क्वचितच घडतात, तरीही विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
भाषेच्या संदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना जी भाषा निवडली आहे, त्याच भाषेत परीक्षा द्यावी लागेल. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असेल, मात्र उत्तर देताना निवडलेल्या भाषेचे पालन करणे अनिवार्य असेल. या नव्या नियमांमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक स्पष्ट, सुसंगत आणि विद्यार्थ्याभिमुख होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: Bhagirath Bhalke: 'जिंदगी की असली उडान अभी बाकी है...'; एकनाथ शिंदेंकडून भगीरथ भालकेंना 'लॉटरी'चे संकेत, पंढरपूर-मंगळवेढ्याची राजकीय समीकरणे बदलणार