Monday, May 11, 2026 11:28:53 AM

SRH Vs CSK IPL 2026: हातातला सामना चेन्नईने असा घालवला! प्रफुल हिंगेच्या त्या 'डेथ ओव्हर्स'ने हैदराबादला मिळवून दिला अशक्यप्राय विजय

195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई 111/3 अशा मजबूत स्थितीत होती, मात्र ईशान मलिंगा आणि हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत सामना फिरवला.

srh vs csk ipl 2026 हातातला सामना चेन्नईने असा घालवला प्रफुल हिंगेच्या त्या डेथ ओव्हर्सने हैदराबादला मिळवून दिला अशक्यप्राय विजय

हैदराबाद: Sunrisers Hyderabad ने हैदराबादमध्ये झालेल्या थरारक सामन्यात Chennai Super Kings वर 12 धावांनी मात केली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 194 धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईची सुरुवात दमदार झाली होती आणि एका टप्प्यावर सामना पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता.

195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने 10 षटकांत 111 धावा केल्या होत्या. त्यावेळी संघाच्या 7 विकेट शिल्लक होत्या आणि विजय अगदी सोपा वाटत होता. शेवटच्या 10 षटकांत चेन्नईला फक्त 84 धावांची गरज होती. मात्र त्याचवेळी हैदराबादच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले.

11व्या षटकात ईशान मलिंगा याने निर्णायक धक्का दिला. त्याने प्रथम सरफराज खान याला बाद केले आणि त्यानंतर अवघ्या काही चेंडूंमध्ये डेवाल्ड ब्रेविस यालाही तंबूत धाडले. या दोन विकेट्समुळे चेन्नईच्या डावाची घसरगुंडी सुरू झाली.

हेही वाचा: PM Narendra Modi Address: 'स्त्री सर्व काही माफ करते, पण अपमान विसरत नाही...'; महिला आरक्षण विधेयकावरून पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घणाघात

एका बाजूला चेन्नईचा स्कोर 3 बाद 111 असा मजबूत होता, पण पाहता पाहता संघ 154 धावांपर्यंत पोहोचेपर्यंत 7 विकेट गमावून बसला. शिवम दुबे हा शेवटपर्यंत चेन्नईच्या आशा जिवंत ठेवत होता. मात्र साकिब हुसेन याच्या गोलंदाजीवर तो क्लीन बोल्ड झाला आणि चेन्नईला मोठा धक्का बसला.

शेवटच्या दोन षटकांत चेन्नईला 30 धावांची गरज होती. नितीश कुमार रेड्डी याने 19व्या षटकात 12 धावा दिल्या, त्यामुळे अखेरच्या षटकात चेन्नईला 18 धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूंवर 3 धावा आल्या. त्यानंतर प्रफुल हिंगे याने नो-बॉल टाकल्याने हैदराबादची चिंता वाढली. मात्र फ्री-हिटवर मोठा फटका न मारल्याने हैदराबादने सुटकेचा निश्वास सोडला.

अखेरच्या षटकात प्रफुल हिंगेने अचूक यॉर्कर्स टाकत चेन्नईला रोखले. चौथ्या चेंडूवर त्याने जेमी ओव्हरटन याला बाद केले आणि हैदराबादचा विजय जवळपास निश्चित केला. अशाप्रकारे जिंकलेला सामना चेन्नईच्या हातातून निसटला आणि हैदराबादने शानदार पुनरागमन करत महत्त्वाचा विजय मिळवला. 

हेही वाचा: PM Narendra Modi: 'हे विरोधी पक्ष विसरत आहेत...'; समाजवादी पक्ष पंतप्रधान मोदींच्या निशाण्यावर, नेमकं काय म्हणाले?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या