Tuesday, November 18, 2025 09:44:54 PM

SC On Cough Syrup Case: विषारी कफ सिरप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! CBI चौकशीस नकार देत फेटाळली याचिका

या प्रकरणात अ‍ॅडव्होकेट विशाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल करून न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

sc on cough syrup case विषारी कफ सिरप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय cbi चौकशीस नकार देत फेटाळली याचिका

SC On Cough Syrup Case: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे अनेक मुलांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडून करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात अ‍ॅडव्होकेट विशाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल करून न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यांच्या याचिकेत नमूद करण्यात आले होते की, विषारी सिरपमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये गंभीर निष्काळजीपणा झाला आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. 

विशाल तिवारी यांनी CBI मार्फत स्वतंत्र तपासाची मागणी केली होती, जेणेकरून सत्य परिस्थिती समोर येऊ शकेल. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाने नमूद केले की, याचिकाकर्त्याने यापूर्वीच अनेक (सुमारे 10) जनहित याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकेचे आधार फक्त माध्यमांतील बातम्या आहेत. त्यामुळे ती पुढील सुनावणीसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

हेही वाचा - Pradhan Mantri Dhan Dhanya Krishi Yojana : प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेतून शेतकऱ्यांसाठी 24 हजार कोटींचा निधी होणार खर्च; राज्यातील 'या' जिल्ह्यांचा समावेश

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे उपस्थित राहून या याचिकेला तीव्र विरोध केला. त्यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज, वैद्यकीय अहवाल किंवा पुरावे नाहीत. बातम्यांवर आधारित जनहित याचिका न्यायालयात टिकू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा Karnataka : सरकारी कार्यक्रमात कुराण पठण केल्याने नवा वाद; काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली, वादग्रस्त व्हिडिओ समोर

न्यायालयाने अखेरीस याचिकेचा विचार करण्यास नकार देत ती फेटाळून लावली. तथापि, या प्रकरणावर राज्यस्तरावर आणि केंद्र सरकारच्या औषध नियामक संस्थांकडून आधीपासूनच प्राथमिक तपास सुरू आहे. या निर्णयानंतर आता कोल्ड्रिफ सिरप प्रकरणात CBI चौकशीची शक्यता संपुष्टात आली आहे. मात्र, मुलांच्या मृत्यूमागील कारणांची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी समाजात आणि राजकीय वर्तुळात कायम आहे.


सम्बन्धित सामग्री