पश्चिम बंगाल: 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, सुवेंदू अधिकारी यांची एकूण नेटवर्थ (निव्वळ संपत्ती) साधारण 85 लाख 87 हजार रुपये आहे. राजकारणातील दिग्गज चेहरा असूनही त्यांची संपत्ती अनेक बड्या नेत्यांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. या संपत्तीचे दोन मुख्य भाग आहेत, चल संपत्ती आणि अचल संपत्ती. विशेष म्हणजे, इतकी वर्षे राजकारणात सक्रिय असूनही त्यांच्यावर कोणतेही कर्ज किंवा देणी (Liabilities) नाहीत.
खिशात केवळ 12 हजार आणि स्वतःची कारही नाही
सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे, सुवेंदू अधिकारी यांच्याकडे 'कॅश-इन-हॅन्ड' म्हणजेच रोख रक्कम म्हणून केवळ 12 हजार रुपये आहेत. आजच्या काळात जिथे नेत्यांकडे महागड्या गाड्यांचा ताफा असतो, तिथे सुवेंदू यांच्या नावावर कोणतीही स्वतःची खासगी कार नाही. इतकेच नाही तर, सोने-चांदीचे दागिने किंवा मौल्यवान वस्तूंच्या रकान्यातही त्यांनी 'काहीही नाही' असे नमूद केले आहे. त्यांच्या एकूण चल संपत्तीचे मूल्य सुमारे 24 लाख 57 हजार रुपये इतके आहे.
बँक खाती आणि ताळेबंद
सुवेंदू अधिकारी यांचे एकूण 14 वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती आहेत. यामध्ये पीएनबी, एसबीआय आणि ॲक्सिस बँकेसह अनेक सहकारी बँकांचा समावेश आहे. या सर्व खात्यांमध्ये मिळून एकूण 7 लाख 34 हजार रुपये जमा आहेत. गुंतवणुकीचा विचार केल्यास, त्यांनी सुरक्षित पर्यायांना पसंती दिली आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (NSC) 5.45 लाख रुपये, किसान विकास पत्रामध्ये 2.60 लाख रुपये आणि 6 एलआयसी पॉलिसींमध्ये सुमारे 7.71 लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली आहे.
हेही वाचा: West Bengal Government Formulation: बंगालमध्ये आज शपथविधी सोहळा! भाजपचे सुवेंदू अधिकारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, मोदी-शाहांसह हे नेते राहणार उपस्थित
अचल संपत्तीचा विचार केला तर सुवेंदू अधिकारींकडे 61 लाख 30 हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची बहुतेक संपत्ती पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आहे, जो अधिकारी कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. नंदीग्राममध्ये 9 लाख रुपयांची शेतीयोग्य जमीन, तर पंचदरिया आणि धर्मदासबर परिसरात 27.5 लाख रुपयांची बिगरशेती जमीन त्यांच्या नावावर आहे. तसेच तामलुक आणि कुमारपूरमध्ये त्यांचे स्वतःचे फ्लॅट्स असून करकुली येथील वडिलोपार्जित घरात त्यांचा हिस्सा आहे.
कमाईचे साधन काय आहे?
प्रतिज्ञापत्रानुसार, 2024-25 या आर्थिक वर्षात त्यांचे वार्षिक उत्पन्न 17 लाख 38 हजार रुपयांच्या वर होते. त्यांच्या कमाईचे मुख्य स्त्रोत म्हणजे आमदार म्हणून मिळणारे वेतन, माजी खासदार म्हणून मिळणारी पेन्शन आणि त्यांचा व्यवसाय आहे. ममता बॅनर्जी यांना नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघात धूळ चारून इतिहास रचणारे सुवेंदू अधिकारी आता मुख्यमंत्री म्हणून बंगालच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाले आहेत.
हेही वाचा: Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? भीषण वाहतूक कोंडीत नागरिकांचा संताप अनावर