Tuesday, June 09, 2026 02:35:00 PM

Vijay Thalapathy: 5 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर 'थलपती विजय' मुख्यमंत्री; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत नवं सरकार स्थापन

तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

vijay thalapathy 5 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर अखेर थलपती विजय मुख्यमंत्री चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत नवं सरकार स्थापन

तामिळनाडूच्या राजकारणात अखेर मोठी घडामोड घडली असून अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या सत्तेवर अधिकृतपणे पदार्पण केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय अनिश्चिततेला पूर्णविराम देत विजय यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना झाली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेवरून मोठ्या हालचाली सुरू होत्या. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने विविध राजकीय चर्चांना वेग आला होता. मात्र अखेर विजय यांनी १२१ आमदारांचा पाठिंबा मिळवत बहुमत सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर राज्यपालांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले.

आज सकाळी झालेल्या शपथविधी सोहळ्यात विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच स्टेडियममध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. टीव्हीकेच्या झेंड्यांनी आणि विजय यांच्या फोटोंनी संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता. राज्यभरातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रीय पातळीवरील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची विशेष चर्चा रंगली. त्याशिवाय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि मान्यवरांनीही सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेत्री त्रिशा कृष्णनन यांच्या उपस्थितीकडेही चाहत्यांचे लक्ष लागले होते.

दरम्यान, विजय यांच्यासह नऊ मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. एन. आनंद, आधव अर्जुना, डॉ. के.जी. अरुणराज, के.ए. सेंगोट्टय्यान, पी. व्यंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टीके. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्थना यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. नव्या सरकारकडून रोजगार, पायाभूत सुविधा आणि युवकांसाठी विशेष योजना राबवल्या जातील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

तमिळनाडूच्या राजकारणात विजय यांच्या एन्ट्रीमुळे आता राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून विजय कितपत यशस्वी ठरतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या