Thursday, February 12, 2026 11:55:00 PM

Wingo App Scam : केंद्र सरकारची मोठी कारवाई; विंगो ॲपसह 50 यूट्यूब व्हिडिओ आणि Telegram चॅनेल्सवर बंदी

हे अॅप केवळ लोकांची आर्थिक फसवणूक करत नसून, वापरकर्त्यांच्या फोनचा ताबा घेऊन त्यांच्या नकळत इतरांना फसवे संदेश पाठवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

wingo app scam  केंद्र सरकारची मोठी कारवाई विंगो ॲपसह 50 यूट्यूब व्हिडिओ आणि telegram चॅनेल्सवर बंदी

Wingo App Scam : देशातील वाढत्या सायबर फसवणुकीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या Cyber Crime Coordination Centre (I4C) ने 'Wingo' नावाचे मालवेअर ॲप  आणि त्याच्याशी संबंधित अनेक टेलिग्राम चॅनेलवर बंदी घातली आहे. हे अॅप केवळ लोकांची आर्थिक फसवणूक करत नसून, वापरकर्त्यांच्या फोनचा ताबा घेऊन त्यांच्या नकळत इतरांना फसवे संदेश पाठवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

फसवणुकीची 'मोडस ऑपरेंडी': पैसे दुप्पट करण्याचे आमिष
विंगो ॲप  लोकांना कमी वेळात मोठी कमाई आणि सोपी कामे पूर्ण करण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढत असे. एकदा का युजरने ॲप डाउनलोड केले की, त्यांना गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे जमा करण्यास भाग पाडले जात होते. यासाठी वैयक्तिक वॉलेटचा वापर केला जाई. जेव्हा मोठ्या प्रमाणात पैसे जमा व्हायचे, तेव्हा हे ॲप अचानक बंद व्हायचे आणि वापरकर्त्यांची खाती कायमची ब्लॉक केली जात असत.

हेरगिरीचा खळबळजनक आरोप
तपासात असे समोर आले आहे की, हे ॲप केवळ आर्थिक फसवणूक करत नव्हते तर 'स्पायवेअर' म्हणूनही काम करत होते. इन्स्टॉल होताच हे ॲप कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरी आणि लोकेशनचा प्रवेश मिळवत असे. तुमच्या फोनचा वापर करून हे ॲप इतरांना बनावट मेसेज पाठवत असे, ज्यामुळे तुम्ही गुन्ह्यात अडकण्याची शक्यता निर्माण व्हायची. सरकारने या ॲपचे सर्व्हर 'जिओ-ब्लॉक' केले असून, 153,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले 4 टेलिग्राम चॅनेल आणि 50 पेक्षा जास्त यूट्यूब व्हिडिओ हटवले आहेत.

हेही वाचा - Economic Survey: सोशल मीडियाचं वेड देशाला महागात पडतयं; डिजिटल व्यसनामुळे नोकऱ्या अन् अर्थव्यवस्थेला बसतोय मोठा फटका

स्वतःला सुरक्षित कसे ठेवाल? (Government Guidelines)
केंद्र सरकारने अँड्रॉइड युजर्ससाठी महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत: 
1. अज्ञात अॅप्स टाळा: भरघोस परतावा देणाऱ्या संशयास्पद अॅप्सना डाउनलोड करू नका. 
2. परवानग्या तपासा: गॅलरी किंवा SMS चा एक्सेस मागणारे अॅप्स धोक्याचे असू शकतात. 
3. व्यवहार करताना काळजी: कोणत्याही अज्ञात UPI ID वर पैसे पाठवू नका किंवा OTP कोणाशीही शेअर करू नका. 
4. त्वरीत कारवाई: जर हे ॲप तुमच्या फोनमध्ये असेल, तर ते आताच Uninstall करा.

जर तुम्ही सायबर फसवणुकीचे बळी ठरलात, तर विलंब न करता 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या सरकारी पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवा. 
 


सम्बन्धित सामग्री