Digital Arrest Fraud : देशात 'डिजिटल अरेस्ट'च्या माध्यमातून होणाऱ्या वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार एका मोठ्या क्रांतीकारी योजनेवर काम करत आहे. या योजनेनुसार, लवकरच तुमच्या UPI आणि बँकिंग अॅप्समध्ये एक विशेष 'फ्रीझ' (Freeze) किंवा 'किल स्विच' (Kill Switch) बटण उपलब्ध करून दिले जाऊ शकते. या बटणाच्या एका क्लिकवर ग्राहकाला आपली सर्व बँक खाती आणि डिजिटल व्यवहार त्वरित गोठवता येणार आहेत.
कसे काम करेल हे 'फ्रीझ' बटण?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गृह मंत्रालय या तांत्रिक सुविधेसाठी बँकांशी चर्चा करत आहे. या बटणाचे वैशिष्ट्य म्हणजे फसवणूक झाल्याचा संशय येताच हे बटण दाबल्यास सर्व पेमेंट ट्रान्सफर तात्काळ थांबतील. हे बटण दाबताच संबंधित बँकेला आपोआप एक 'अलर्ट' जाईल, ज्यामुळे धोकादायक व्यवहार रोखण्यास मदत होईल. केवळ बँकच नाही, तर या बटणाद्वारे पीडित व्यक्तीच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा किंवा त्यांना सतर्क करण्याचा पर्यायही उपलब्ध असेल.
हेही वाचा - Barrier Free Toll Collection : आता हायवेवर विनाअडथळा प्रवास; पण टोल चुकवला तर होतील मोठ्या अडचणी, केंद्राचे नवीन नियम लागू
काय आहे 'डिजिटल अरेस्ट'ची भीती?
डिजिटल अरेस्टमध्ये सायबर भामटे पोलीस, कस्टम किंवा आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट व्हिडिओ कॉल करतात. एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन लोकांकडून लाखो-कोट्यवधी रुपये उकळले जातात. या भीतीपोटी लोक घाईघाईत पैसे ट्रान्सफर करतात. अशा परिस्थितीत 'फ्रीझ' बटण हे पीडितासाठी एक सुरक्षा कवच ठरणार आहे.
विमा क्षेत्रातील फसवणुकीवरही नजर
सरकार केवळ बँकिंगच नव्हे तर विमा (Insurance) क्षेत्रातील फसव्या पेमेंटला रोखण्यासाठीही पावले उचलत आहे. रिझर्व्ह बँकेने यासाठी 'डिजिटल पेमेंट प्रोटेक्शन फंड' स्थापन करण्याची सूचना दिली आहे. कोणत्याही फसवणुकीला केवळ वापरकर्त्याची चूक न मानता, तो संपूर्ण सिस्टमसाठी धोका मानून त्यावर उपाययोजना करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊन नागरिकांचे कोट्यवधी रुपये चोरीला गेले आहेत. ही नवीन अलर्ट सिस्टिम अशा गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करेल अशी अपेक्षा आहे.