Indigo Flight Bomb Threat : कुवेतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब आणि अपहरणाची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याने आज प्रचंड खळबळ उडाली. या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचे अहमदाबाद विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या घटनेमुळे विमानात असलेल्या 180 प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे हे विमान कुवेतहून दिल्लीच्या दिशेने झेपावले होते. विमान हवेत असतानाच एका टिश्यू पेपरवर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये विमानाचे अपहरण करून ते बॉम्बने उडवून देण्याची धक्कादायक धमकी देण्यात आली होती. ही बाब निदर्शनास येताच वैमानिकाने तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विमानाची दिशा वळवून अहमदाबाद विमानतळावर ते सुरक्षितपणे उतरवले.
180 प्रवाशांची कसून तपासणी
विमान अहमदाबादमध्ये उतरताच सुरक्षा यंत्रणांनी ताबा घेतला. विमानातील सर्व 180 प्रवाशांना खाली उतरवून त्यांची आणि त्यांच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली. विमानतळ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्रवाशाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून विमानाची झडती घेतली जात आहे. विमान सध्या 'आयसोलेशन बे'मध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा - Union Budget 2026 Expectations : भारताचा अर्थसंकल्प जागतिक आव्हानांना देणार टक्कर; सरकार आणि RBI चा 'मास्टर प्लॅन' सज्ज!
धमकीचे सत्र सुरूच
विमानांना अशा प्रकारे धमक्या मिळण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी, म्हणजेच 22 जानेवारी रोजी, दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या (6ई 2608) विमानालाही अशाच प्रकारे बॉम्बची धमकी देण्यात आली होती. पुणे विमानतळावर विमान उतरल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली होती, मात्र तेव्हा काहीही संशयास्पद आढळले नव्हते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कुवेत-दिल्ली विमानातील त्या टिश्यू पेपरवर चिठ्ठी कोणी ठेवली, याचा शोध आता तांत्रिक तपास आणि प्रवाशांच्या चौकशीतून लावला जात आहे.