Stock Market Recovery : भारतीय शेअर बाजारात मंगळवार, 27 जानेवारी रोजी कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सत्रात विक्रीच्या दबावामुळे बाजार गडगडला होता, मात्र दुपारनंतर धातू (Metal), बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराने उसळी घेतली. सेन्सेक्स आपल्या दिवसाच्या नीचांकी पातळीपासून तब्बल 500 अंकांनी सावरत 81,899.83 च्या उच्चांकावर पोहोचला, तर निफ्टीने 25,184.95 ची पातळी गाठली.
भारत-EU व्यापार कराराच्या बातमीने बाजारात उत्साह
आजच्या या सुधारणेमागे भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील येऊ घातलेला मुक्त व्यापार करार (FTA) हे मुख्य कारण मानले जात आहे. या करारामुळे भारतीय कंपन्यांना युरोपची मोठी बाजारपेठ खुली होईल आणि निर्यातीला चालना मिळेल, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. मात्र, जिओ इन्व्हेस्टमेंट्सचे डॉ. व्ही.के. विजयकुमार यांच्या मते, ही घोषणा सकारात्मक असली तरी हा करार प्रत्यक्षात येण्यासाठी 2027 पर्यंत वाट पाहावी लागू शकते.
अमेरिकेकडून 'टॅक्स' सवलतीचे संकेत; आयटी क्षेत्राला दिलासा
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी दावोसमध्ये दिलेले विधान भारतीय बाजारासाठी 'गेम-चेंजर' ठरले. भारताने रशियन तेलाची खरेदी कमी केल्यास, अमेरिका भारतावर लादलेला 25 टक्के अतिरिक्त कर काढून घेण्याचे संकेत दिले आहेत. हा निर्णय झाल्यास भारतीय आयटी आणि उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात मोठी वाढ होऊ शकते, ज्याचे प्रतिबिंब आजच्या व्यवहारात दिसून आले.
हेही वाचा - Gold Silver Rates Today: खरेदीदारांना 'धडकी', तर गुंतवणूकदारांची 'दिवाळी'; बजेटपूर्वी सराफा बाजारात सोन्याची ऐतहासिक वाढ, आजचे दर काय?
रुपया सावरला आणि कच्च्या तेलात घसरण
गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेला भारतीय रुपया आज विक्रमी नीचांकी पातळीवरून 10 पैशांनी सावरला. 92 च्या ऐतिहासिक नीचांकी पातळीवरून रुपया आता 91.80 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 0.72 टक्क्यांची घसरण होऊन ते प्रति बॅरल 65.12 डॉलरवर आले आहे. कच्च्या तेलाच्या घसरणीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने शेअर बाजाराला मोठा पाठिंबा मिळाला आहे.
जागतिक बाजारातील तेजीचा फायदा
भारतीय बाजारातील सुधारणेला जागतिक संकेतही कारणीभूत ठरले. आशियाई बाजारपेठेत निक्केई, कोस्पी आणि हँग सेंग हे निर्देशांक वाढीसह बंद झाले. तसेच सोमवारी अमेरिकन बाजारात झालेल्या खरेदीच्या सत्रामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांचे मनोधैर्य उंचावले, ज्याचा परिणाम आजच्या तेजीमध्ये दिसून आला.