Saturday, March 07, 2026 02:40:55 AM

ChatGPT In India: भारतात AI चा डंका, दर आठवड्याला 100 दशलक्ष भारतीयांकडून ChatGPT चा वापर; सॅम ऑल्टमन यांचा मोठा खुलासा

भारतीय लोक दैनंदिन कामात आणि शिक्षणात चॅटजीपीटीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

chatgpt in india भारतात ai चा डंका दर आठवड्याला 100 दशलक्ष भारतीयांकडून chatgpt चा वापर सॅम ऑल्टमन यांचा मोठा खुलासा

ChatGPT In India: भारतात एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत वेगाने वाढत असून, दर आठवड्याला 100 दशलक्ष सक्रिय वापरकर्त्यांसह भारत आता अमेरिकेनंतर चॅटजीपीटीची जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनला आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. भारतीय लोक दैनंदिन कामात आणि शिक्षणात चॅटजीपीटीचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सोमवारपासून नवी दिल्ली येथे सुरू होणाऱ्या 5 दिवसांच्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये ऑल्टमन यांच्यासह जगातील अनेक दिग्गज एआय कंपन्यांचे अधिकारी सहभागी होत आहेत.

ओपनएआयची यशस्वी रणनीती आणि भारतीय विस्तार
इतर जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांप्रमाणेच, ओपनएआयने भारताची तरुण लोकसंख्या आणि 1 अब्जाहून अधिक इंटरनेट वापरकर्त्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीने ऑगस्ट 2025 मध्ये नवी दिल्लीत आपले कार्यालय सुरू करून भारतीय बाजारपेठेत आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. भारतासारख्या किंमत-संवेदनशील बाजारपेठेसाठी कंपनीने विशेष धोरण राबवले. सुरुवातीला साधारण 450 रुपये किमतीत 'चॅटजीपीटी गो टियर' लाँच केल्यानंतर, नंतर ही सेवा भारतीय वापरकर्त्यांसाठी 1 वर्षासाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली. या धोरणामुळे वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.

जागतिक स्तरावर 900 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा जवळ
सॅम ऑल्टमन यांच्या मते, चॅटजीपीटीचा एकूण जागतिक वापरही झपाट्याने वाढत आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत या प्लॅटफॉर्मने 800 दशलक्ष साप्ताहिक सक्रिय वापरकर्त्यांचा टप्पा गाठला होता, जो आता 90 दशलक्षच्या जवळ पोहोचला आहे. यामध्ये भारताचा वाटा अत्यंत मोलाचा असून, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात भारतीय विद्यार्थी चॅटजीपीटीचा सर्वाधिक वापर करत आहेत. अभ्यासाचे नियोजन करणे, जटिल विषय समजून घेणे आणि मुलाखतीची तयारी करणे यासाठी भारतीय विद्यार्थ्यांमध्ये एआय चॅटबॉट्सची मोठी पसंती दिसून येत आहे.

हेही वाचा - Gold Locker Fraud: ज्यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या, त्यांनीच केला विश्वासघात; तब्बल साडेतीन कोटींचे सोने बँकेच्या लॉकरमधून लंपास, काय आणि कसं घडलं नेमकं?

गुगल आणि ओपनएआयमध्ये विद्यार्थ्यांसाठी चढाओढ
भारतीय विद्यार्थ्यांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी केवळ ओपनएआयच नव्हे, तर गुगलदेखील मोठ्या मोहिमा राबवत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये गुगलने भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या 'एआय प्रो' योजनेचे 1 वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन जाहीर केले होते. गुगलच्या शिक्षण विभागाचे महाव्यवस्थापक क्रिस फिलिप्स यांनी नमूद केले की, भारतात शिक्षणासाठी 'जेमिनी' एआयचा वापर जगात सर्वाधिक होतो. सध्या गुगल आणि ओपनएआय या दोन्ही कंपन्या भारतीय शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना आणि फीचर्स सादर करत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री