Donald Trump: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील 'कर्तव्य पथ' नव्या भारताच्या सामर्थ्याने उजळून निघाला. या सोहळ्यात भारतीय हवाई दलाने आकाशात 'ऑपरेशन सिंदूर'ची थरारक रचना सादर करत जगाचे लक्ष वेधून घेतले. एकीकडे भारत आपले लष्करी सामर्थ्य दाखवत असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला शुभेच्छा देताना एक महत्त्वाचा संदेश जारी केला.
दोन्ही देशांमधील 'ऐतिहासिक संबंधां'चा पुनरुच्चार
व्यापार आणि कर धोरणांवरून दोन्ही देशांत काही अंशी तणाव असतानाही, ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका हे जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे लोकशाही देश असल्याचे अधोरेखित करत दोन्ही देशांमधील 'ऐतिहासिक संबंधां'चा पुनरुच्चार केला.
ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, "अमेरिकेच्या जनतेच्या वतीने, मी भारताच्या सरकार आणि जनतेला त्यांच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनी माझे मनापासून अभिनंदन करतो. जगातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे लोकशाही देश म्हणून, अमेरिका आणि भारत ऐतिहासिक संबंध सामायिक करतात." नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाने ट्रम्प यांचा हा सदिच्छा संदेश सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आहे.
हेही वाचा - India Europe Trade Deal: "आम्ही रणनीतिक भागीदारी निवडली कारण..." पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी युरोपीय अध्यक्षांचे सूचक वक्तव्य
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनीही भारताचे अभिनंदन केले. संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि 'क्वाड' (Quad) मधील भागीदारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, यंदाच्या संचलनात अमेरिकन बनावटीची 'सी-130 जे' वाहतूक विमाने आणि 'अपाचे' हेलिकॉप्टरनेही आपली ताकद दाखवली. यंदाच्या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
परेडमध्ये आत्मनिर्भर भारताची झलक
'वंदे मातरम' या संकल्पनेवर आधारित असलेल्या यंदाच्या परेडमध्ये आत्मनिर्भर भारताची झलक पाहायला मिळाली. "वंदे मातरम, स्वातंत्र्याचा मंत्र, स्वावलंबी भारत, समृद्धीचा मंत्र" या थीमवर आधारित 30 चित्ररथांनी कर्तव्य पथावरून प्रवास केला. भारतीय हवाई दलाच्या 16 लढाऊ विमानांसह एकूण 29 विमानांनी नेत्रदीपक 'फ्लायपास्ट' करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार युद्ध सुरू असताना ट्रम्प यांनी दिलेला हा संदेश भारत-अमेरिका मैत्रीच्या भविष्यासाठी अत्यंत सकारात्मक मानला जात आहे.