मुंबई: केंद्र सरकारच्या यंदाच्या अर्थसंकल्पाला एक दमदार पाऊल असे संबोधत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि पुरेसा निधी देण्याचा ठोस प्रयत्न या अर्थसंकल्पात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रसाठी चांगली आणि अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवणे, व्यापारवृद्धीला चालना देणे आणि आर्थिक विकासाला गती देणे हे या अर्थसंकल्पाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे फडणवीस म्हणाले. महिलांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प फायदेशीर असून, शिक्षण क्षेत्रासाठी विशेष आणि भरीव तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रत्येक ग्रोथ हबसाठी पुढील पाच वर्षांत 5000 कोटी रुपयांचा निधी देण्याची योजना अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा महाराष्ट्राला होणार असून, राज्यातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: PM Modi On Budget 2026: 'नारीशक्तीचे प्रतिबिंब अन् विकसित भारताचा पाया...'; पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पातील घोषणांचे स्वागत
विरोधकांकडून नेहमीच “महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही” असा आरोप केला जातो; मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातील आकडेवारीच या आरोपांना उत्तर देणारी असल्याचे फडणवीस म्हणाले. केंद्र सरकारकडून यावर्षी महाराष्ट्राला 98 हजार 306 कोटी रुपयांचा निधी मिळणार असून, मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदा 15 ते 20 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या अर्थसंकल्पातून ग्रामीण रस्त्यांसाठी 378 कोटी, ॲग्री बिझनेस नेटवर्कसाठी 167 कोटी, इकॉनोमिक क्लस्टरसाठी 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी हेल्थकेअर कार्यक्रमासाठी 385 कोटी, उपसा सिंचन सौरऊर्जीकरणासाठी 207 कोटी आणि ॲग्री डेव्हलपमेंट अँड रुरल ट्रान्सफरसाठी 646 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई - अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉरसाठी 6103 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1702 कोटी आणि पुणे मेट्रोसाठी 517 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
दरम्यान, जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत पुन्हा एकदा सिद्ध झाला असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. विकासाभिमुख धोरणे आणि भरीव निधीमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला नवसंजीवनी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: Budget 2026 Updates: पदवीसोबतच आता 'यूट्यूबर' होण्याचे स्वप्न पूर्ण होणार; 500 महाविद्यालयांमध्ये सुरू होणार हाय-टेक लॅब्स