नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026) 1 फेब्रुवारी रोजी सादर होणार असून, यंदा तो रविवारच्या दिवशी येत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. साधारणपणे शनिवार-रविवारी बंद असणारा शेअर बाजार (Stock Market) यावेळी सुरू राहणार की नाही, याबाबत गुंतवणूकदार आणि ट्रेडर्समध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराने अधिकृत भूमिका स्पष्ट केल्याने चित्र आता बरेचसे स्पष्ट झाले आहे.
National Stock Exchange (NSE) आणि Bombay Stock Exchange (BSE) यांनी जाहीर केले आहे की, 1 फेब्रुवारी 2026 रोजी, रविवार असूनही शेअर बाजार पूर्णपणे खुला राहणार आहे. 1999 नंतर पहिल्यांदाच असा प्रसंग येत आहे की, रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असून त्याच दिवशी विशेष ट्रेडिंग सेशन ठेवण्यात आले आहे. या दिवशी बाजार नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता Pre Open Session ने सुरू होईल आणि 9 वाजून 15 मिनीटे ते दुपारी साडेतीन या वेळेत नियमित ट्रेडिंग होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार असून, त्याच वेळी बाजारात मोठी हालचाल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मात्र, शेअर बाजार खुला असला तरी गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा नियम लक्षात घेणे गरजेचे आहे. 1 फेब्रुवारी हा ‘Settlement Holiday’ असल्यामुळे त्या दिवशी व्यवहार होतील, पण शेअर्स आणि पैशांचा प्रत्यक्ष सेटलमेंट (Settlement) होणार नाही. म्हणजेच, शुक्रवार 30 जानेवारी रोजी खरेदी केलेले शेअर्स रविवारी विकता येणार नाहीत. तसेच, बजेटच्या दिवशी खरेदी केलेले शेअर्स पुढील दिवशी म्हणजेच सोमवार, 2 फेब्रुवारी रोजीही विकता येणार नाहीत. त्या दिवशी झालेले सर्व व्यवहार पुढील दिवशी सेटल केले जाणार आहेत.
हेही वाचा: Seema Savale: "सत्तेची नशा चढली की..." महेश लांडगेंच्या माफीनाम्यानंतर सीमा सावळे यांचा थेट प्रहार
हा नियम बँका आणि क्लिअरिंग हाउस (Clearing House) रविवारी बंद असल्यामुळे लागू केला जातो. त्यामुळे T+0 म्हणजेच त्याच दिवशी सेटलमेंटची सुविधा 1 फेब्रुवारीला उपलब्ध राहणार नाही. विशेषतः Short Term Trading करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे बजेट डे ट्रेडिंग करताना अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
शेअर बाजारासोबतच बजेटच्या दिवशी कमोडिटी मार्केटही (Commodity Market) सुरू राहणार आहे. Multi Commodity Exchange (MCX) ने स्पष्ट केले आहे की, 1 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात कमोडिटी ट्रेडिंग सुरू राहील. त्यामुळे सोने-चांदीसह इतर कमोडिटीजवर बजेटचा तात्काळ परिणाम गुंतवणूकदारांना पाहता येणार आहे.
बजेट डे हा शेअर बाजारासाठी नेहमीच अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक मानला जातो. मागील 25 वर्षांच्या आकडेवारीनुसार, बहुतांश वेळा बजेटच्या दिवशी बाजारात 1 टक्क्यांपेक्षा जास्त चढ-उतार दिसून आला आहे. कररचना (Taxation), सरकारी खर्च (Government Spending) आणि विविध सेक्टर्ससाठी जाहीर होणाऱ्या योजना यांचा थेट परिणाम कंपन्यांवर होतो. सध्या सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी (Nifty) या महिन्यात तीन टक्क्यांहून अधिक घसरले असल्याने गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, बजेट डे ट्रेडिंगमध्ये संधी जितक्या आहेत, तितकेच धोकेही आहेत. Short Term Traders साठी वोलॅटिलिटीचा फायदा घेण्याची संधी असते, तर Long Term Investors साठी बजेटनंतरची स्पष्ट दिशा समजून घेऊन मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित ठरते. त्यामुळे 1 फेब्रुवारीला शेअर बाजार खुला असला, तरी सेटलमेंट नियम आणि जोखीम लक्षात घेऊनच निर्णय घेणे हेच गुंतवणूकदारांच्या हिताचे ठरणार आहे.
हेही वाचा: Sharad Pawar on NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाआधीच दादांची एक्झिट, अजितची इच्छा पूर्ण करणार; शरद पवार नेमकं काय म्हणाले...